'400 फीट अंदर गाड देंगे'! विरोधी पक्षातील नेत्याचं PM मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य; VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 02:27 PM2024-04-17T14:27:48+5:302024-04-17T14:28:02+5:30
भाजपने त्यांच्या या वक्तव्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. JMM नेते नजरुल इस्लाम यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. या वक्तव्यावरून नजरूल यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, भाजपने त्यांच्या या वक्तव्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.
यानंतर, भाजपने 'I.N.D.I.A.'वर पंतप्रधान मोदींवर जिवघेणा हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोपही केला आहे. तसेच, आपण पंतप्रधानांविरोधात कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह विधान केलेले नाही. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, असे नजरुल इस्लाम यांनी म्हटले आहे.
'आत्म्यात हिटलर, 400 फूट आत गाडून टाकू' -
यासंदर्भात पोलिसांनी नजरुल इस्लामविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ते म्हणताना दिसत आहेत की, 'नरेंद्र मोदी यांच्या आत्म्यात आता हळुहळू हिटलर बसताना दिसत आहे. त्याला राज्यघटना बदलायची आहे. आम्ही 400 पार जाऊ, अशी घोषणा त्याने दिली आहे. आज मी तुम्हाला सांगतो, 400 जागा नाही, तर नरेंद्र मोदीला 400 फूट आत गाडले जाईल." यानंतर उपस्थित लोक टाळ्या वाजवतात. मात्र, लोकमत या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.
YOU want to bury PM Modi 400 feet beneath the ground and Call him PM Hitler? JMM Leader Nazrul Islam, it will be your green army of converts that will end up down there with your green book of hate! Wait for election day and be ready to weep. You are Making death threats to the… pic.twitter.com/Dwe8h3u5Y1
— JIX5A (@JIX5A) April 16, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट, भाजपचा आरोप -
भाजप प्रदेश प्रवक्ता प्रतुल शाहदेव यांनी I.N.D.I.A. वर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. प्रतुल म्हणाले, नजरुल इस्लाम यांचे वक्तव्य सार्वजनिक होऊन 24 तास उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. यावरून सरकार अशा अराजकतावादी घटकांना प्रोत्साहन देत असल्याचे सिद्ध होते.
यापूर्वी, कोडरमा येथे एका आरजेडी नेत्यानेही मोदींसंदर्भात विधान केले होते. या सिक्वेन्स वरून स्पष्ट होते की, I.N.D.IA.चे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काही तरी मोठी घटना घडवून आणण्यासाठी कट रचत आहेत आणि जनतेला भडकवत आहेत.
निवडणूक आयोगाकडे तक्रार -
झामुमोच्या केंद्रीय समिती सदस्याच्या वक्तव्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भाजपने नजरुल इस्लाम यांच्या अटकेची मागणी केली आहे.