आम्ही दिलेली गॅरंटी पूर्ण करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रचार सभेत प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 05:32 AM2024-04-18T05:32:49+5:302024-04-18T05:33:41+5:30
मी २०१४ मध्ये आशा, २०१९ मध्ये विश्वास व २०२४ मध्ये हमी घेऊन लोकांसमोर गेलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले.
नलबारी : मी २०१४ मध्ये आशा, २०१९ मध्ये विश्वास व २०२४ मध्ये हमी घेऊन लोकांसमोर गेलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. आसाममधील नलबारी येथे बोकुरा मैदानात आयोजिलेल्या प्रचार सभेत ते म्हणाले की, देशभरात दिलेल्या विविध गोष्टींच्या हमीची आम्ही नक्कीच पूर्तता करणार आहोत.
नरेंद्र मोदी म्हणाले की, मोदी सरकारने दिलेल्या हमीचा ईशान्य भारत हा साक्षीदार आहे. या भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसने फक्त आश्वासने दिली होती. मात्र भाजपने हे प्रश्न सोडविण्याच्या दिशेने पावले टाकली. काँग्रेसला ईशान्य भारतातील बंडखोरीला खतपाणी घातले पण आमच्या सरकारने या भागात शांतता प्रस्थापित केली. ६० वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेस पक्ष जी कामगिरी करू शकला नाही ती आम्ही दहा वर्षांत करून दाखविली.
मोदी यांनी सांगितले की, आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत ७० आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचारही दिले जातील. उपचाराचा खर्च त्या रुग्णाच्या कुटुंबासाठी ओझे बनू नये याची काळजी सरकार घेईल. तुमचा हा मुलगा तुमच्या वैद्यकीय खर्चाची काळजी घेईल, असे भावनिक उद्गार या भाषणात मोदी यांनी काढले.
सूर्यटिळा पाहताना भावुक
- रामनवमीनिमित्त अयोध्येतील सूर्यटिळा उत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाहिला पण थेट विमानात.
- नलबाडी येथील सभा संपल्यानंतर पुढील प्रचारसभेसाठी विमानातून जाताना त्यांनी आपल्या टॅबवर मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा पाहिला. या वेळी त्यांनी त्यांची पादत्राणे बाजूला काढून ठेवली होती,
‘काँग्रेसने ईशान्य भारताला लुटले’
- काँग्रेसने ईशान्य भारताला लुटण्याचे तर भाजपने या भागाचा विकास करण्याचे काम केले, असे मोदी यांनी म्हटले.
- ते म्हणाले की, भाजपच्या राज्य सरकारच्या कार्यकाळात त्रिपुराचा विकास झाला आहे.