"मालदीव असं काही करणार नाही ज्यामुळे भारताला..."; मोहम्मद मुइज्जूंचे चीनबाबत मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 10:08 AM2024-10-07T10:08:11+5:302024-10-07T10:41:29+5:30
Mohamed Muizzu : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताच्या सुरक्षेला कधीही धक्का पोहोचू देणार नाही, असे म्हटले आहे
Maladiv Mohamed Muizzu In India : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि मालदीवच्या फर्स्ट लेडी साजिदा मोहम्मद या भारत दौऱ्यावर आहेत. भारताच्या पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यासाठी रविवारी दोघेही नवी दिल्लीत आले. यादरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मुइज्जू यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या मालदीवच्या अध्यक्षांच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. यावेळी मोहम्मद मुइज्जू यांनी भारताच्या सुरक्षेला कधीही धक्का पोहोचू देणार नाही, असे म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी चीनचा देखील उल्लेख केला. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. मुइज्जू रविवारी त्यांच्या पत्नीसह नवी दिल्लीत पोहोचले. मुइज्जू यांचे सरकार मालदीवमध्ये आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशाचे भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यासाठी मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला भेट दिली आहे. चीनच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे मुइज्जू हे सत्तेत बसल्यापासून हाती घेतल्यापासून भारत आणि मालदीवमधील संबंध ताणले गेले होते. पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत त्यांच्या मंत्र्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली होती.
त्यानंतर आता भारत दौऱ्यादरम्यान मोइज्जू यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. एका मुलाखतीमध्ये तुम्ही चीनसोबत काम करत आहात, त्यामुळे भारताला खात्री आहे का की मालदीव भारताच्या संरक्षण हितांवर परिणाम होईल असे काहीही करणार नाही, असा प्रश्न मुइज्जू यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना चीनसोबतच्या संबंधांमुळे भारताच्या सुरक्षेला कधीही धोका निर्माण होणार नाही, असं विधान मोहम्मद मुइज्जू यांनी केलं आहे. "मालदीव भारताची सुरक्षा कमकुवत होईल असे काहीही करणार नाही. भारत हा मालदीवचा महत्त्वाचा भागीदार आणि मित्र आहे आणि आमचे संबंध परस्पर आदर आणि समान हितांवर आधारित आहेत," असं मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटलं.
यावेळी मुइज्जू यांना मालदीवमधून भारतीय सैन्याच्या माघारीच्या निर्णयाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. "मालदीव आणि भारत यांना आता एकमेकांचे प्राधान्यक्रम आणि चिंता या गोष्टी चांगल्या प्रकारे समजल्या आहेत. मालदीवच्या लोकांनी मला जे सांगितले ते मी केले. सैन्य मागे घेण्याचा निर्णय हा आमचा देशातील लोकांसाठी असलेला प्राधान्यक्रम दाखवत होता. आमच्या भूतकाळातील करारांवर निर्णय घेण्याचे उद्दिष्ट आमच्या राष्ट्रीय हितांशी सुसंगत आणि स्थिरतेसाठी सकारात्मक योगदान देण्याचे होते, असेही मोहम्मद मुइज्जू म्हणाले.
दरम्यान, मुइज्जू यांच्या भेटीदरम्यान परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारत आणि मालदीवमधील संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली.