देश तोडणाऱ्या जिनांचं उदात्तीकरण कशासाठी?- योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 12:01 PM2018-05-03T12:01:25+5:302018-05-03T12:01:25+5:30
जिनांचा छायाचित्र लावण्यावरून मोठा वादंग
नवी दिल्ली: अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मोहम्मद अली जिनांच्या छायाचित्रावरुन निर्माण झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. देश तोडणाऱ्या जिनांचं उदात्तीकरण कशासाठी?, असा प्रश्न उपस्थित करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या वादात उडी घेतलीय. 'जिनांमुळे देशाची फाळणी झाली. अशा व्यक्तीचं कर्तृत्व आपण कसं काय साजरं करू शकतो?,' असा सवाल आदित्यनाथ यांनी विचारलाय. ते कर्नाटकमध्ये बोलत होते.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात मोहम्मद अली जिनांचं छायाचित्र लावण्यावरुन झालेल्या वादाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आदित्यनाथ यांनी दिली. चौकशीचा अहवाल येताच त्वरित कारवाई करण्यात येईल, असंही ते म्हणाले. 'या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. देशाची फाळणी करणाऱ्या जिनांचं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नाही,' असंही त्यांनी सांगितलं. ते इंग्रजी वृत्तवाहिनी इंडिया टुडेसोबत बोलत होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ बंगळुरूत दाखल झालेत.
वारंवार होत असलेल्या वादांमुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून जिनांचं छायाचित्र हटवण्यात आलं. परिसरात स्वच्छता सुरू असल्याचं कारण यासाठी देण्यात आलं. विद्यापीठाच्या वातावरणातील तणाव वाढत असल्यानं बुधवारी याठिकाणी आरएएफच्या दोन कंपनी तैनात करण्यात आल्या. मंगळवारी विद्यापीठ परिसरात मोठं आंदोलन झालं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीदेखील केली होती.