आम्ही लक्ष्मणरेखा ओलांडणार नाही!
By Admin | Published: September 25, 2015 12:34 AM2015-09-25T00:34:44+5:302015-09-25T00:34:44+5:30
संसदेने कसे कामकाज करावे हे आम्ही त्यांना सांगणे म्हणजे राज्यघटनेने आखून दिलेली लक्ष्मणरेखा ओलांडणे ठरेल. त्यामुळे आम्ही ती लक्ष्मणरेखा ओलांडणार नाही
नवी दिल्ली : संसदेने कसे कामकाज करावे हे आम्ही त्यांना सांगणे म्हणजे राज्यघटनेने आखून दिलेली लक्ष्मणरेखा ओलांडणे ठरेल. त्यामुळे आम्ही ती लक्ष्मणरेखा ओलांडणार नाही, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने संसदेला सुरळीत कामकाजासाठी मार्गदर्शिका ठरवून देण्यासाठी केलेली एक जनहित याचिका गुरुवारी फेटाळली.
‘फाऊंडेशन फॉर रिस्टोरेशन आॅफ नॅशनल व्हॅल्यूज’ या स्वयंसेवी संस्थेने केलेली जनहित याचिका फेटाळताना सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तू व न्या. अतिताव रॉय यांच्या खंडपीठाने सांगितले की,संसदेच्या कामावर आम्ही देखरेख करू शकत नाही. सभागृहाचे कामकाज कसे चालवायचे हे लोकसभा अध्यक्षांना चांगले ठाऊक आहे. आम्ही लक्ष्मणरेखा लक्षात ठेवायला हवी. आम्हाला ती कधीच ओलांडता येणार नाही. ती लक्ष्मणरेखा ओलांडून आम्ही संसदेला, तुम्ही अशा प्रकारे काम करा किंवा असा प्रकारे करू नका, असे सांगू शकत नाही.
याचिकाकर्त्याच्या वकिलाने युक्तिवाद सुरु केल्यावर त्याला थांबवत सरन्यायाधीशांनी विचारले, तुम्ही तुमचे घर (न्यायालये) तरी स्वच्छ ठेवले आहे का? कदाचित तुम्हाला माहित नसेल. (पण) किती घरे स्वच्छ आहेत याची,सरन्यायाधीश या नात्याने, मला चांगली माहिती आहे. सरन्यायाधीशांच्या या भाष्याचा संदर्भ मद्रास उच्च न्यायालयात अलीकडेच घडलेल्या घटनेशी होता. तेथे वकिलांनी मुख्य न्यायाधीशांच्या न्यायालयात घोषणा देत कामकाज बंद पाडले होते.
पण देशातील सर्वोच्च न्यायालय तरी स्वच्छ आहे, असे सांगून या वकिलाने सरन्यायाधीशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण सरन्यायाधीशांनी त्याला पुढे बोलू दिले नाही.
सततचा गोंधळ व घोषणाबाजी, सभागृहात होणारी निदर्शने व सदस्यांची अनुपस्थिती यामुळे संसदेचे कामकाज सुरळितपणे चालत नाही. यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाऊन अंतिमत: सरकारी तिजोरीवर नाहक बोजा पडतो. त्यामुळे न्यायालयाने संसदेला सुरळीत कामकाज कसे करावे यासाठी मार्गदर्शिका ठरवून द्यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)