"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 15:33 IST2024-09-22T15:33:18+5:302024-09-22T15:33:54+5:30
Tirupati Laddu Controversy: देशातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरामध्ये प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडवांसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपातील भेसळीचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. दरम्यान, या भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारही आक्रमक भूमिका घेऊन कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक
देशातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरामध्ये प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडवांसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपातील भेसळीचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. दरम्यान, या भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारही आक्रमक भूमिका घेऊन कारवाई करण्याच्या तयारीत आहे. आंध्र प्रदेशचे माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री नारा लोकेश यांनीही या भेसळप्रकरणी परखड मत व्यक्त केलं आहे. तिरुपती मंदिरातील लाडवांमध्ये वापरण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींपैकी कुणालाही राज्य सरकार सोडणार नाही, तसेच कुणाचीही गय केली जाणार नाही, असे नारा लोकेश यांनी स्पष्टपणे सांगितले.
नारा लोकेश यांनी सांगितले की, एनडीडीबीच्या प्रयोगशाळेच्या अहवालामुळे भेसळ झाल्याचे करण्यात आलेले आरोप खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे या वादाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. चंद्राबाबू यांनी सर्व पुराव्यानिशी याबाबतचा आरोप केला होता. आम्ही कुणालाही सोडणार नाही. तसेच हा विषय केवळ सीबीआयकडे सोपवून थांबणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
हल्लीच आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या एनडीएच्या आमदारांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागच्या वायएसआरसीपी सरकारच्या काळात श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरालाही सोडण्यात आलं नाही. तिरुपतीमध्ये लाडू तयार करण्यासाठी दुय्यम साहित्याचा आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला, असा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणावरून देशभरात वादाला तोंड फुटलं होतं.