चीनएवढेच आम्हीही तुल्यबळ, घुसखोरी अजिबात खपवून घेणार नाही - लष्करप्रमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 05:50 AM2018-01-13T05:50:37+5:302018-01-13T05:50:47+5:30
भारत आपल्या भूमिवर कोणाचेही आक्रमण खपवून घेणार नाही, असे ठाम मत मांडतानाच लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पुढे सांगितले की, चीन हा भले सामर्थ्यशाली असेल, पण भारतही काही कमी नाही. तोही बलवान आहे.
नवी दिल्ली : भारत आपल्या भूमिवर कोणाचेही आक्रमण खपवून घेणार नाही, असे ठाम मत मांडतानाच लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पुढे सांगितले की, चीन हा भले सामर्थ्यशाली असेल, पण भारतही काही कमी नाही. तोही बलवान आहे.
बिपिन रावत यांनी आज पत्रकारांना सांगितले की, उत्तर सीमेवर भारताने आता अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. चीनच्या आक्रमक धोरणाला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतात आहे. भारताच्या उत्तर सीमाभागात चीनी लष्कराने घुसखोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याबाबत ते म्हणाले की, आमच्या सीमा भागात कोणी घुसखोरी करत असेल, तर ते भारत अजिबात खपवून घेणार नाही. चीन हा भले सामर्थ्यशाली असेल, पण भारतही काही कमी बलवान नाही. चीनकडून सीमेवर सातत्याने कारवाया सुरू असून, भारताने कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची तयारी ठेवली आहे.
शस्त्रसामुग्रीची ने-आण एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जलद गतीने करता यावी, तसेच उत्तर सीमेवरून पश्चिम सीमेवर लष्कर वेगाने हलविता यावे, यासाठी उत्तम व्यवस्था निर्माण करण्यावर भारताला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
रासायनिक, जैविक शस्त्रे आणि अण्वस्त्रांच्या वापराचा वाढता धोका
रासायनिक, जैविक, रेडिआॅलॉजिकल अस्त्रे व अण्वस्त्रांच्या वापराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे, असे सांगून बिपिन रावत पुढे म्हणाले की, अशा शस्त्रे चुकीच्या माणसांच्या हातात पडणे व त्यांनी त्यांचा वापर करण्याचा धोका निर्माण होणे ही सर्वात गंभीर गोष्ट आहे. या शस्त्रांमुळे मोठी जीवितहानी व वित्तहानी होण्याचा धोका असून, त्याचे दूरगामी परिणामही भोगावे लागतील.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा बीमोड करू
गेल्या वर्षी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा बीमोड करण्यावर लष्कराने लक्ष केंद्रित केले होते. यंदाच्या वर्षी उत्तर काश्मीरमध्ये आम्ही दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी अधिक सक्रिय राहू, असे लष्करप्रमुख बिपिन रावत पुढे म्हणाले.
आपल्याही जवानांना चांगल्या सुविधा हव्यात
चीनच्या लष्कराचे उत्तर सीमेवर घुसखोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळेच सिक्कीम, तसेच ईशान्य सीमेवर तैनात भारतीय जवानांना बुलेट प्रूफ हेल्मेट देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा लागला, अशी चर्चा आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बिपिन रावत म्हणाले की, चीनचे सैन्य आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. त्यामुळे सीमेवर तैनात असलेल्या आपल्याही जवानांना उत्तम दर्जाची जॅकेट्स व हेल्मेट मिळायला हवीत, असा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला.