शेतकऱ्यांनो, तुमच्या आडवी असलेली भिंत हटवतोय; पंतप्रधान मोदींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:38 PM2020-12-12T12:38:22+5:302020-12-12T12:38:56+5:30
PM Narendra Modi in FICCI AGM: पीएम-वाणी योजनेद्वारे सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉटचे जाळे तयार होईल. गावागावात कनेक्टिव्हीटीचा व्यापक विस्तार होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिक्कीच्या ९३ व्या जनरल बैठकीचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत सध्या ज्वलंत बनलेल्या कृषी कायदा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना अडचणीची ठरणारे सर्व अडथळे, भिंती आम्ही हटवत आहोत, असे मोदी म्हणाले.
कृषी क्षेत्राशी जोडलेले उद्योगधंदे जसे की एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर, फूड प्रोसेसिंग, स्टोरेज, कोल्ड चेन यामध्ये आम्ही मोठमोठ्या भिंती पाहिल्या आहेत. आता या भिंती हटविल्या जात आहेत. सर्व अडचणी दूर केल्या जात आहेत. या बदलांनंतर शेतकऱ्यांना नवीन बाजार मिळणार आहेत. नवीन पर्याय मिळणार आहेत. तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. कोल्ड स्टोरेज इंफ्रास्ट्रक्चर आधुनिक होईल. यामुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक होईल. याचा फायदा माझ्या देशातील शेतकऱ्यांना होईल असे मोदी म्हणाले.
पीएम-वाणी योजनेद्वारे सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉटचे जाळे तयार होईल. गावागावात कनेक्टिव्हीटीचा व्यापक विस्तार होईल. माझे तुम्हाला आवाहन आहे की तुम्ही ग्रामीण आणि निम-शहरी भागातील क्षेत्रात चांगल्या कनेक्टिव्हीटीच्या प्रयत्नांचे भागीदार व्हा. २१ व्या शतकात भारताच्या विकासाला गाव आणि छोटी शहरेच मदत करणार आहेत, असा मला विश्वास वाटतो असेही मोदी म्हणाले.
देशात कृषी क्षेत्राला मजबूत बनविण्यासाठी गेल्या काही वर्षांच वेगाने काम केले आहे. यामुळे भारतातील कृषी क्षेत्र आधीपेक्षा अधिक व्हायब्रंट झाले आहे. आज शेतकऱ्यांसमोर त्यांचे उत्पादन मंडईच्या बाहेर विकण्याचा पर्याय आहे. मंडईंचे आधुनिकीकरण होत आहे. शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर उत्पादन विकण्याचा, खरेदी करण्याचा पर्याय मिळाला आहे. हे सारे फक्त शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच करण्यात आले आहे. जेव्हा देशाचा शेतकरी समृद्ध होईल तेव्हा देशही समृद्ध होईल असेही मोदी यांनी सांगितले.
गेल्या ६ वर्षांत भारताने असे सरकार पाहिले आहे जे केवळ आणि केवळ १३० कोटी देशवासियांच्या स्वप्नांसाठी समर्पित आहे. प्रत्येक स्तरावरील देशवासियाला पुढे नेण्यासाठी काम करत आहे. गेल्या काही महिन्यांत आम्ही एकत्र येऊन काम केले आहे. नीती बनविली, निर्णय घेतले, परिस्थिती सांभाळली आहे. यामुळे सारे जग चकित झाले आहे, असेही मोदींनी या बैठकीमध्ये सांगितले.