...तर अवघ्या 24 तासांमध्ये राम मंदिराचा प्रश्न सोडवू- योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 06:19 AM2019-01-27T06:19:41+5:302019-01-27T07:06:33+5:30
लवकरात लवकर निकाल देण्याचं सर्वोच्च न्यायालयाला आवाहन
लखनऊ: अयोध्या प्रकरणाचा निकाल 24 तासांच्या आत लावून दाखवण्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. राम मंदिराच्या प्रश्नावर लोकांचा संयम संपत आला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय याबद्दलचा निकाल देत नाही. त्यामुळे हे प्रकरण आमच्याकडे सोपवा. चोवीस तासांच्या आत या प्रश्नावर मार्ग काढू, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
अयोध्या प्रश्नावर मार्ग कसा निघणार? संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटणार की आणखी काही करणार?, असे प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आले. त्यावर न्यायालयाला हे प्रकरण आमच्याकडे सोपवू तर द्या, असं उत्तर आदित्यनाथ यांनी दिलं. 'हा वाद लवकर संपुष्टात आणावा, असं आवाहन मी न्यायालयाला करतो. रामजन्मभूमीच्या वादावार अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं 30 सप्टेंबर 2010 मध्ये आदेश दिलेला नाही. हिंदू मंदिर नष्ट करण्यासाठी इथे बाबरी मशीद उभारण्यात आली, ही बाब न्यायालयानं स्वीकारली आहे. उच्च न्यायालयाच्या सुचनेवरून पुरातत्व विभागानं त्या ठिकाणी खोदकाम केलं. हिंदू मंदिर किंवा स्मारक नष्ट करण्यासाठीच बाबरीचा ढाचा उभारला गेला, असा अहवाल पुरातत्व विभागानं न्यायालयाला दिला आहे,' असं योगी म्हणाले.
अयोध्या प्रकरणात न्यायालयानं लवकरात लवकर निकाल द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. 'निकाल देण्यासाठी अनावश्यक विलंब झाल्यास लोकांचा संस्थांवरील विश्वास उडेल. त्यामुळे संकट निर्माण होत आहे,' असं योगी म्हणाले. 'न्यायालयाला लवकर निकाल देणं जमत नसेल, तर त्यांनी हे प्रकरण आमच्याकडे सोपवावं. आम्ही अवघ्या 24 तासांमध्ये या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाकू,' असा दावा त्यांनी केला. या प्रकरणी मोदी सरकारनं अध्यादेश का आणला नाही, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना योगींनी पुन्हा न्यायालयाचा उल्लेख केला. न्यायप्रविष्ट प्रकरणांवर संसदेत चर्चा होऊ शकत नाही. आम्ही हा विषय न्यायालयावर सोडला आहे, असं ते म्हणाले.