काँग्रेसशिवाय दिल्लीत लोकसभेच्या सर्व जागा जिंकू : केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 05:37 PM2019-03-12T17:37:06+5:302019-03-12T17:39:38+5:30
केंद्रातील मोदी सरकारला रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र येत असताना, दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने एकेमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याचं दिसून येत आहे.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही लोकसभेच्या जागा काँग्रेसशिवाय जिंकण्याचा दावाही केजरीवाल यांनी केला आहे.
केंद्रातील मोदी सरकारला रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र येत असताना, दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने एकेमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकांबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, येणारी निवडणूक दिल्लीकरांसाठी महत्त्वपूर्ण आहे. यावेळी दिल्लीकर पंतप्रधान बनविण्यासाठी नव्हे तर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदान करतील. तर, दुसरीकडे दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित म्हणतात की, काँग्रेस पक्ष आम आदमी पक्षासोबत युती करणार नाही. परंतु अंतर्गत सर्व्हेमध्ये 'आप' दिल्लीतील सातही जागा जिंकणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधामुळे भाजपला नुकसान होणार असल्याचे सर्व्हेत समोर आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत केजरीवाल पुढे म्हणाले की, राज्य घटनेत एका व्यक्तीला एक मत आहे. मात्र, दिल्लीतील एका व्यक्तीला अर्धे मत आहे. दिल्लीतील लोक केंद्र सरकारला दीड हजार कोटी रुपये टॅक्स देतात. पण, केंद्राकडून दिल्लीला केवळ 325 कोटी रुपये मिळतात. मागील 70 वर्षांपासून दिल्लीच्या लोकांचे शोषण होत, असल्याचेदेखील केजरीवाल यांनी म्हटले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपसोबत जाण्यास नकार दिल्याने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली होती. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस भाजपला मदत करत आहे. तसेच काँग्रेसने भाजपसोबत छुपी युती केल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला होता.