'भाजपनं डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणुका घेतल्या तर...', ममता बॅनर्जी स्पष्टच बोलल्या, केला मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 06:07 PM2023-08-28T18:07:04+5:302023-08-28T18:10:46+5:30
ममतांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीची शक्यता व्यक्त केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) डिसेंबर महिन्यातच लोकसभा निवडणूका घेतल्या, तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या सोमवारी (28 ऑगस्ट) कोलकाता येथे बोलत होत्या.
ममतांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर निशाणा साधत बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, राज्यपाल घटनात्मक नियमांचे उल्लंघन करत आहेत, मी या पदाचा आदर करते, पण त्यांच्या असंवैधानिक कारवायांचे समर्थन करत नाही.
"भाजपने बुक केली आहेत सर्व हेलिकॉप्टर - "
याच वेळी, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इतर राजकीय पक्षांना प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर करता येऊ नये, म्हणून भाजपने आधीच सर्व हेलिकॉप्टर बुक केली आहेत, असा दावाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, आम्ही बंगालमधून सीपीआय(एम)ला हटवले. आता लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करू. भाजपने आपल्या देशाला आधीच सामुदायिक कटूतेचा देश बनवले आहे. जर ते पुन्हा सत्तेवर आले, तर आपला देश द्वेषाचा देश बनेल.