माफ करा, हे प्रकरण पटलावर घेणार नाही; सरन्यायाधीशांचा याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 06:00 AM2022-10-15T06:00:30+5:302022-10-15T06:01:04+5:30
तुम्ही दोन महिने आधीच याचिका दाखल करायला हवी होती, असे सरन्यायाधीश यू. यू. लळित आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिवाळी जवळ आली आहे आणि लोकांनी फटाक्यांच्या व्यवसायात पैसे गुंतविले असतील, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फटाक्यांवर बंदी घालण्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
‘दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. लोकांनी फटाक्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवले असतील. तुम्ही दोन महिने आधीच याचिका दाखल करायला हवी होती, माफ करा. पण आम्ही आता हे प्रकरण पटलावर घेणार नाही,’ असे सरन्यायाधीश यू. यू. लळित आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने सांगितले. आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाही तसे केल्यास या व्यवसायात गुंतवणूक केलेले व्यवसायाबाहेर फेकले जातील, याचिकेबाबत दिवाळीनंतर विचार केला जाईल, असे खंडपीठाने सांगितले.
दरम्यान, राजधानी दिल्लीत १ जानेवारी २०२३ पर्यंत सर्वप्रकारच्या फटाक्यांची साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याच्या आदेशाविरुद्धच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"