७१ खासदारांच्या संपत्तीत २८६ टक्क्यांनी झाली वाढ; एडीआरचा अहवाल, अशी वाढली संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 12:37 PM2023-02-06T12:37:40+5:302023-02-06T12:38:16+5:30
या काळात भाजपचे कर्नाटकातील खासदार रमेश चंदप्पा जिगजिनगी यांच्या मालमत्तेत सर्वाधिक वाढ नोंदविली गेली, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) एका अहवालात म्हटले आहे. हा अहवाल शुक्रवारी येथे जारी करण्यात आला.
नवी दिल्ली : २००९ ते २०१९ या कालावधीत लोकसभेवर पुन्हा निवडून आलेल्या ७१ खासदारांच्या संपत्तीत सरासरी तब्बल २८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात भाजपचे कर्नाटकातील खासदार रमेश चंदप्पा जिगजिनगी यांच्या मालमत्तेत सर्वाधिक वाढ नोंदविली गेली, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) एका अहवालात म्हटले आहे. हा अहवाल शुक्रवारी येथे जारी करण्यात आला.
जिगजिनगी यांच्याकडे २००९ मध्ये एकूण १.१८ कोटी रुपयांची मालमत्ता होती. ती २०१४ मध्ये ८.९४ कोटी रुपये आणि पुढे २०१९ मध्ये ५०.४१ कोटी रुपयांवर गेली, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या कालावधीत झालेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान जिगजिनगी यांनी सादर केलेल्या शपथपत्रांच्या आधारे एडीआरने त्यांच्या संपत्तीतील वाढीचा लेखाजोखा मांडला आहे. ते कर्नाटकातील विजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
दुसऱ्या क्रमांकावरही कर्नाटकचेच खासदार -
एडीआर-नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालानुसार, कर्नाटकातील भाजपचे आणखी एक खासदार पी. सी. मोहन यांनी २००९ ते २०१९ दरम्यान मालमत्तेत सर्वाधिक वाढ झालेल्या १० संसद सदस्यांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. २०१९ मध्ये बंगळुरू मध्य मतदारसंघातून लोकसभेवर पुन्हा निवडून आलेल्या मोहन यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ५.३७ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. १० वर्षांत हा आकडा ७५.५५ कोटी रुपयांपर्यंत गेला.
सुळे, बादल, वरुण गांधी यांचीही नावे -
उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले भाजप खासदार वरुण गांधी यांची संपत्ती २००९ मधील ४.९२ कोटी रुपयांवरून २०१९ मध्ये ६०.३२ कोटी रुपयांपर्यंत वाढली. भटिंडा येथील शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांची संपत्ती २००९ मधील ६०.३१ कोटी रुपयांवरून २०१९ मध्ये २१७.९९ कोटी रुपयांवर गेली. बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांची संपत्ती २००९ मधील ५१.५३ कोटी रुपयांवरून २०१९ मध्ये १४०.८८ कोटी रुपयांवर गेली.