‘करतारपूर बॉर्डरवर तुमच्यासाठी हत्यारं…’ खलिस्तानी दहशतवादी पन्नू शेतकऱ्यांना भडवण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 10:07 AM2024-02-19T10:07:46+5:302024-02-19T10:08:38+5:30
Farmer Protest: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना भडकवण्यास सुरुवात केली आहे.
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना भडकवण्यास सुरुवात केली आहे. गुरपतवंत सिंह पन्नू याने एक व्हिडीओ प्रसिद्ध करून त्यामधून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना हरियाणा आणि पंजाबमध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्रे पुरवण्याची तयारी दर्शवली आहे.
बंदी घालण्यात आलेल्या शीख फॉर जस्टिस या संघटनेचा म्होरक्या असलेल्या गुरपतवंत सिंह पन्नू याने नव्या व्हिडीओमध्ये हरियाणाजवळील पंजाबच्या शंभू आणि खनौरी बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करताना करतारपूर बॉर्डरलर हत्यारं ठेवण्यात आली आहेत, असा दावा केला. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणण्यासाठी या हत्यारांनी पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करा, अशी चिथावणी पन्नू याने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिली.
पन्नू म्हणाला की, भारतीय गोळ्यांना तुम्ही गोळ्यांनीच प्रत्युत्तर द्या. त्यासाठी पाकिस्तानला लागून असलेल्या करतारपूर बॉर्डरवर शस्त्रास्त्रे ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे गुप्तचर यंत्रणांकडून दिलेल्या माहितीनुसार गुरपतवंत सिंह पन्नू हा भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना विरोध करणं हा त्यांचा वैध अधिकार आहे. कुठलाही शेतकरी एसएफजेच्या चिथावणीला बळी पडणार नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच चर्चा सुरू आहे.
संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि शेतकरी मजूर मोर्चा यांना बोलावलेल्या दिल्ली चलो मोर्चाचा आज सहावा दिवस आहे. यादरम्यान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतातील अनेक मार्गांवर शेतकरी रस्त्यावर उभे आहेत. तर दिल्लीकडे कूच करणाऱ्या या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.