उत्तर प्रदेशमध्ये दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 11:03 AM2019-04-16T11:03:26+5:302019-04-16T11:20:52+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. बुलंदशहर येथे पोलिसांनी तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर दारू आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे.
बुलंदशहर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी (१५ एप्रिल) दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. बुलंदशहर येथे पोलिसांनी तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर दारू आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलंदशहर जिल्ह्यात सोमवारी रात्री तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा साठा पोलिसांना आढळून आला.
४०५ अवैध हत्यारं, ७३९ कार्ट्रिज, २ कोटी रुपयांची दारू, दीड कोटींची रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला शस्त्रसाठा हा हिंसाचार घडवण्याच्या दृष्टीने जमा करण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी नेते धनाच्या बळाचाही वापर करताना दिसत आहेत. देशात सहा टप्प्यांतील मतदान अद्याप बाकी आहे. या आधी केलेल्या कारवाईत ड्रग्स, दारू, सोने, चांदी, रोकड व अन्य वस्तू मिळून २,५०४ कोटींचा बेहिशेबी मुद्देमाल जप्त केला आहे. सर्वाधिक मुद्देमाल गुजरातमधून हस्तगत करण्यात आला होता.
Bulandshahr: Police seized huge quantity of weapons and liquor during regular checking in the district yesterday. SSP N Kolanchi says, "405 illegal weapons, 739 cartridges, liquor worth Rs 2 Crore, Rs 1.5 Crore cash have been seized. We will continue checking like this." pic.twitter.com/kknhKXW2YG
— ANI UP (@ANINewsUP) April 16, 2019
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात ४८,८०४ किलोपेक्षा अधिक ड्रग्स पकडण्यात आले आहे. याची किंमत १,१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. याशिवाय २०७ कोटी रुपये किमतीची १०४ लाख लीटर दारू आणि ५०० कोटी रुपयांचे सोने, चांदी व अन्य धातू, तसेच ६४७ कोटींची रोकड जप्त करण्यात आली. गुजरातमध्ये सर्वाधिक ५१७ कोटी, तामिळनाडूत ४७९ कोटी, दिल्लीत ३९८ कोटी आणि आंध्र प्रदेशात २१६ कोटींचा बेहिशेबी मुद्देमाल जप्त केला आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक ५.६ कोटींचे १४,६७८ किलो ड्रग्स आणि जवळपास २० कोटी रुपयांची २६ लाख लीटर दारू पकडण्यात आली. अर्थात, सर्वाधिक किमतीचे ड्रग्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात गुजरातमध्ये जप्त करण्यात आले. येथे १२३ किलो ड्रग्ज पकडण्यात आले. याची किंमत ५०० कोटी रुपये आहे. या राज्यात १० कोटींची दारूही जप्त करण्यात आली. राजधानी दिल्लीत २४९ आणि पंजाबमध्ये १५० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, देशभरात आतापर्यंत ६४७ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. यात सर्वाधिक १८३ कोटी तामिळनाडू, १३७ कोटी आंध्र प्रदेशमधून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर, तेलंगणा ६८ कोटी, उत्तर प्रदेश ३५ कोटी, दिल्ली ३२.५ कोटी आणि कर्नाटक ३० कोटी, याप्रमाणे रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी माहिती दिली की, आतापर्यंत सोने-चांदी यासारख्या मूल्यवान धातूंची जप्ती करण्यात आली आहे. याची किंमत ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यात २४८ कोटी रुपयांचे धातू एकट्या तामिळनाडूत जप्त करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात ६८ कोटी, महाराष्ट्रात ४४ कोटी आणि आंध्र प्रदेशात ३३ कोटी रुपयांचे धातू जप्त करण्यात आले आहेत.