'मुस्लिम महिलांनी परपुरुषाच्या हातून बांगड्या भरुन घेणे हराम'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 11:37 AM2018-02-12T11:37:13+5:302018-02-12T11:37:35+5:30
मुस्लिम महिला बाजारात जाऊन किंवा अन्य कुठे परपुरुषांच्या हातून बांगड्या भरुन घेतात हे शरियतच्या विरोधात आहे
सहारनपूर - उत्तर प्रदेशच्या दारुल उलूम देवबंदने अजून एक आश्चर्यकारक फतवा जारी केला आहे. या फतव्यात देवबंदने सांगितलं आहे की, मुस्लिम महिला बाजारात जाऊन किंवा अन्य कुठे परपुरुषांच्या हातून बांगड्या भरुन घेतात हे शरियतच्या विरोधात आहे. देवबंदचे मुफ्ती तारिक कासमी यांनी फतवा जारी करताना म्हटलं आहे की, 'एखाद्या पुरुषाने अनोळखी महिलेला भांगडी भरणं बेकायदेशीर आणि गुन्हा आहे. ज्यांच्याशी रक्ताचं नातं नाही अशा पुरुषांच्या हातून भांगडी भरुण घेणा-या महिलांना समाजातून बहिष्कृत केलं गेलं पाहिजे'.
देवबंदच्या अहमद गौड यांनीच दारुल उलूमला लिखीत प्रश्न विचारला होता की, 'आपल्या येथे साधारणपणे बांगड्या विकण्याचं आणि भरण्याचं काम पुरुषच करतात. महिलांना बांगड्या भरुन घेण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि आपला हात परपुरुषाच्या हातात द्यावा लागतो. अशाप्रकारे घरातून बाहेर पडून किंवा घरातच परपुरुषाच्या हातून बांगडी भरणं योग्य आहे का ?'
या प्रश्नाला उत्तर देताना देवबंदमधील मुफ्तींनी सांगितलं आहे की, 'पुरुषाने अनोळखी महिलेला भांगडी भरणं बेकायदेशीर आणि गुन्हा आहे'. 'ज्यांच्याशी रक्ताचं नातं नाही अशा पुरुषांच्या हातून बांगडी भरुन घेण्यासाठी महिलांनी घराबाहेर पडणं अमान्य आहे', असं देवबंदचे मुफ्ती तारिक कासमी बोलले आहेत. फतव्यात हा गुन्हा असल्याचं सांगण्यात आलं आहे.
बांगड्या भरणं चुकीचं नसल्याचं फतव्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र त्या परपुरुषाच्या हातून भरुन घेतल्या जाऊ नयेत. मुस्लिम महिलांनी बाजारातून बांगड्या मागवून घ्याव्यात आणि स्वत:च त्या भरुन घ्याव्यात असं फतव्यातून सांगण्यात आलं आहे.