मॉलमध्ये बुरखा परिधान करुन 'तिने' केला डान्स, मुस्लिम संघटना भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 05:37 PM2017-09-22T17:37:52+5:302017-09-22T18:01:08+5:30
येथील एका मॉलमध्ये मुस्लिम तरुणीने बुरखा परिधान करुन बॉलिवूड चित्रपटातील 'काला चश्मा' या गाण्यावर डान्स केल्यामुळे येथील काही मुस्लिम संघटनांचा पारा चढला आहे. एका संघटनेने याला तीव्र विरोध केला असून हा प्रकार इस्लाम धर्माच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.
मंगळुरु, दि. 22 - येथील एका मॉलमध्ये मुस्लिम तरुणीने बुरखा परिधान करुन बॉलिवूड चित्रपटातील 'काला चश्मा' या गाण्यावर डान्स केल्यामुळे येथील काही मुस्लिम संघटनांचा पारा चढला आहे. एका संघटनेने याला तीव्र विरोध केला असून हा प्रकार इस्लाम धर्माच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.
मंगळुरुमधील एका मॉलमध्ये आयोजित क्रार्यक्रमात मुस्लिम तरुणीने बुरखा घालून डान्स केला. यावेळी तिच्यासमवेत अन्य काही तरुणी होत्या. त्यांनी बॉलिवूड चित्रपटातील 'काला चश्मा' या गाण्यावर डान्स केला. दरम्यान, मॉलमध्ये उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्यांच्या डान्सचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर त्यांनी डॉन्स केलेला हा व्हिडिओ अवघ्या काही तासांत सोशल मीडियात व्हायरल झाला. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओतील डान्स करणारी मुस्लिम तरुणी कोण आहे, याबाबत अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही. परंतु, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या डान्स केलेल्या मुस्लिम तरुणीवर अनेक मुस्लिम संघटनांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली. यामध्ये जास्तकरुन नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे सांगण्यात येते.
साऊथ कन्नड सलाफी मुव्हमेंटचे उपाध्यक्ष इस्माईल शफी म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करुन डान्स करणे हे इस्लाम धर्माला अनुसरुन नाही. त्यामुळे हा प्रकार धर्माच्या विरोधात आहे. त्या तरुणीने केलेले हे कृत्य चुकीचे आहे. याचबरोबर, बॉलिवूडमध्ये अभिनय करणा-या महिलासुद्धा अनेक दिवसांपासून धर्माच्या विरोधात फोटो, व्हिडिओ शूट करत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये दिसणा-या त्या तरुणीने सुद्धा चित्रपटात काम करणा-या महिलांना फॉलो केल्याचे दिसते, असेही इस्माईल शफी म्हणाले.
इस्लाम धर्मात पुरुषांसह महिलांना सुद्धा स्वातंत्र्य आहे. मुलींना धार्मिक मूल्यांचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी त्यांच्या आई-वडिलांची आहे. दरम्यान, सध्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओतील तरुणी कोण आहे, तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आणि तिच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना धर्माबद्दल माहिती सांगणार असल्याचे इस्लाईल शफी यांनी सांगितले.