अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 03:24 PM2024-05-23T15:24:53+5:302024-05-23T15:26:32+5:30
आठ राज्यांमध्ये पारा 43 अंशांवर आला आहे. राजस्थानच्या अनेक भागात तर तापमान 48 अंशांच्या पुढे गेले आहे.
Weather Alert : यंदाचा उन्हाळा अतिशय उष्ण आणि जीवघेणा ठरतोय. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा कमी होण्याऐवजी वाढत आहे. ही उष्णतेची लाट कधी थांबणार, हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. उत्तर भारतातील आठ राज्यांमध्ये पारा 43 अंशांच्या वरच गेला आहे. राजस्थानच्या अनेक भागात तर तापमान 48 अंशांच्या पुढे गेले आहे. गुजरातमध्येही तापमान 45 च्या पुढे गेल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत उष्णता आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
तापमान 3 ते 4 अंशांनी वाढणार
मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळाली. बाडमेरमध्ये तर या वर्षातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. या प्रचंड उन्हात दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळीही घसरली असून, त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात तीन ते चार अंशांनी तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान खात्याने राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच, या राज्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांना उष्मा-संबंधित आजार आणि उष्माघाताचा इशारा जारी केला आहे. IMD नुसार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये पुढील चार दिवसांत रात्रीच्या उष्णतेमुळे उष्णतेशी संबंधित आजार आणखी वाढू शकतात.
Observed Maximum Temperature Dated 22.05.2024 #maximumtemperature#weatherupdate@moesgoi@DDNewslive@ndmaindia@airnewsalertspic.twitter.com/gkF6INsdQS
— India Meteorological Department (@Indiametdept) May 22, 2024
भूजल पातळी खालावली
अति उष्णतेमुळे वीज ग्रीडवर ताण पडत आहे, पाण्याचे स्त्रोतही कोरडे पडत आहेत. याळे देशाच्या काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या म्हणण्यानुसार, भारतातील 150 प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा गेल्या आठवड्यात पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाण्याची टंचाई वाढली आणि जलविद्युत निर्मितीवर लक्षणीय परिणाम झाला.
24 ठिकाणी तापमानाने 45 अंश पार केले
बुधवारी दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातील किमान 24 ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले. राजस्थानमध्ये बाडमेरमध्ये 48 अंश सेल्सिअस, चुरूमध्ये 47.4 अंश, फलोदीमध्ये 47.8 अंश आणि जैसलमेरमध्ये 47.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. याशिवाय, मध्य प्रदेशातील रतलाम येथे 45 अंश, महाराष्ट्रातील अकोला येथे 44.8 अंश, हरियाणातील सिरसा येथे 47.7 अंश, पंजाबमधील भटिंडा येथे 46.6 अंश, गुजरातमधील कांडला येथे 46.1 अंश आणि उत्तर प्रदेशातील झाशी येथे 45 अंश कमाल तापमानाची नोंद झाली.