हवामानाने वर्षात घेतले २,२७० बळी; देशभरात वीज पडून सर्वाधिक १५८० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 05:36 AM2023-05-02T05:36:55+5:302023-05-02T05:37:26+5:30
१९०१ नंतर २०२२ हे पाचवे सर्वांत अधिक तापमान असलेले वर्ष राहिले. सरासरी १०८ टक्के पाऊस झाला.
नवी दिल्ली : देशात गतवर्षी हवामान फारसे चांगले राहिले नाही. या काळात तापमानही वाढले आणि नंतर पाऊसही खूप झाला. या वर्षात हवामान बदलाच्या तडाख्यात २,२७० जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक १५८० लोकांचा मृत्यू वीज पडल्यामुळे झाला.
१९०१ नंतर २०२२ हे पाचवे सर्वांत अधिक तापमान असलेले वर्ष राहिले. सरासरी १०८ टक्के पाऊस झाला. सरासरी पावसात कर्नाटकनंतर राजस्थान देशात दुसऱ्या क्रमांकावर होते. येथे सरासरीच्या १३६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जीवित व वित्त हानीही मोठ्या प्रमाणावर झाली.
हवामान विभागाच्या पुणे स्थित क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेस सेंटरच्या अहवालात हा खुलासा झाला आहे. या विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी हा अहवाल जारी केला आहे. या अहवालात हवामान बदलामुळे झालेल्या जीवित व वित्त हानीची माहितीही आहे.
केंद्र सरकारच्या राज्यवार वार्षिक हवामान बाबतच्या २०२२ च्या अहवालानुसार देशात या वर्षात मोठा पाऊस, पूर आणि कडकडाटासह वीज पडणे यासारख्या घटना घडल्या. सर्वाधिक ५८९ लोकांचा मृत्यू उत्तर प्रदेशात झाला.
डोंगरी भागात उष्णता अधिक
गतवर्षी पूर्ण देशातच तापमान सरासरीपेक्षा ०.५१ अंश सेल्सिअस अधिक नोंदले गेले. २०१६ मध्ये नोंदल्या गेलेल्या ०.७१ अंश सेल्सिअस तापमानापेक्षा हे कमी होते. मात्र, गतवर्षी डोंगरी भागात उष्णता अधिक होती. गत १०० वर्षांची सरासरी पाहिली तर हिमाचलमध्ये सर्वाधिक १.५ अंश सेल्सिअस तापमान वाढले. देशात गतवर्षी मार्च-एप्रिलमध्ये सहा दिवस कमाल तापमान सामान्यपेक्षा ३ ते ८ अंश सेल्सिअस अधिक राहिले. त्रिपुरा, गोवा, पंजाब, नागालँड व सिक्कीममध्ये जीवित व वित्त हानी कमी झाली.
राजस्थानात उष्णता, पावसाच्याही धारा
राजस्थानात गतवर्षी उष्णता अधिक होती. तसेच, पाऊसही जोरदार बरसला. राज्यात सरासरी तापमान २४.० अंश सेल्सिअस राहिले. हे प्रमाण सरासरीच्या ०.३ अंश सेल्सिअस अधिक आहे. राजस्थानात हे १९०१ नंतरचे १३ वे सर्वांत उष्णतेचे वर्ष ठरले. दोन जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ६० टक्के, २२ जिल्ह्यांत सरासरीच्या २० ते ५९ टक्के पाऊस झाला. ९ जिल्ह्यांत मान्सून सामान्य राहिला. पावसाची सरासरी ४८६.६ मिमी आहे.