पावसाचा प्रकोप! आंध्र-तेलंगणात ३३ जणांचा मृत्यू; नौदलाला केलं पाचारण, IMD चा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 10:31 AM2024-09-04T10:31:01+5:302024-09-04T10:32:32+5:30
आंध्रमध्ये नौदलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. NDRF ने गेल्या २४ तासांत आंध्रमध्ये ५००० आणि तेलंगणात २००० लोकांना वाचवलं आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये विध्वंस सुरू आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येपूर आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्रमध्ये नौदलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. NDRF ने गेल्या २४ तासांत आंध्रमध्ये ५००० आणि तेलंगणात २००० लोकांना वाचवलं आहे. हिमाचल प्रदेशात मंगळवारी झालेल्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग ५ आणि ७०७ सह एकूण ७८ रस्ते बंद झाले.
तेलंगणा आणि आंध्रमध्ये पूरस्थिती
गुजरातमध्येही मंगळवारी अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने या आठवड्यात गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मंगळवारी पावसाने दिलासा दिला. अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी बाधित भागात मदतकार्य सुरू केलं आहे. तेलंगणात आतापर्यंत १६ आणि आंध्र प्रदेशात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सततचा पाऊस आणि पुरामुळे अनेक रस्ते वाहून गेले. याशिवाय हजारो एकरमधील पिकंही नष्ट झाली.
ड्रोनद्वारे पोहोचवलं साहित्य
आंध्र प्रदेशात नौदलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठीही लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने बाधित भागातील लोकांपर्यंत ड्रोनद्वारे मदत साहित्य पोहोचवलं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आपापल्या भागातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. पूरग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर सीएम रेड्डी यांनी महबुबाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि राज्यभरातील अधिकाऱ्यांना रिपोर्ट तयार करण्यास सांगितले.
५ लाख रुपयांची आर्थिक मदत
तेलंगणा सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सीएम रेड्डी यांनी पीएम मोदींना पूरग्रस्त भागांना भेटी देऊन राज्यातील नुकसान भरपाईसाठी ५००० कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आवाहन केलं आहे. यापैकी २००० कोटी रुपयांच्या तात्काळ आर्थिक मदतीचीही मागणी करण्यात आली आहे.
गुजरातमध्येही मुसळधार पाऊस
दक्षिण गुजरातमधील काही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी मुसळधार पाऊस झाला आणि अतिवृष्टीमुळे राज्याच्या मान्सून हंगामातील सरासरी वार्षिक पावसात ११६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. IMD ने पुढील एका आठवड्यात गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. हिमाचल प्रदेशात मंगळवारी झालेल्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग ५ आणि ७०७ सह एकूण ७८ रस्ते बंद झाले.