दिल्लीनंतर महाराष्ट्र आता गुजरात! देशभरात पावसाचा हाहाकार, पहा कुठे काय परिस्थिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 01:01 PM2023-07-23T13:01:42+5:302023-07-23T13:06:14+5:30
मुसळधार पावसाचा परिणाम देशातील बहुतांश राज्यांमध्ये दिसून येत आहे. अनेक राज्यांत पहिल्याच पावसाने हाहाकार उडवून दिला आहे.
महिना-दीड महिना उशिराने आलेल्या पावसाने आधी उत्तराखंड, दिल्ली बुडविली आहे. आता गुजरात पुराच्या पाण्यात बुडू लागले आहे. अहमदाबाद विमानतळ, हॉस्पिटल आदी पाण्याखाली गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात अतिवृष्टी होऊ लागली आहे. अनेक भागांसाठी हा पहिलाच पाऊस आहे, परंतू, तो एवढा मोठ्या प्रमाणावर झाला आहे की सगळीकडे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. आणखी काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगडमध्ये इर्शाळवाडीमध्ये भूस्खलन झाले होते. अहमदाबाद विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते आणि लोकांच्या कार पुरात खराब झाल्या आहेत.
अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्येही पुराचे पाणी घुसले होते. शनिवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये पाणी साचले होते, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. गुजरातमधील अमरेली शहरात देखील पाणी घुसले आहे. एक तरुण हातात गॅस सिलिंडर घेऊन रस्ता ओलांडत होता, मात्र त्याच दरम्यान पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की तो वाहून गेला. संपूर्ण सौराष्ट्रात पुरामुळे परिस्थिती बिकट आहे.
मुसळधार पावसाचा परिणाम देशातील बहुतांश राज्यांमध्ये दिसून येत आहे. आसाममधील गुवाहाटीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात संततधार पावसामुळे तेथील पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडामधील हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक सखल भागात पाणी शिरल्याने घरे पाण्याखाली गेली आहेत.