Weather Updates: कडाक्याच्या थंडीत देशातील 'या' भागांत बरसणार पाऊस, हवामान खात्यानं जारी केला अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:28 PM2022-01-17T18:28:23+5:302022-01-17T18:29:38+5:30
देशातील या राज्यांत दाट धुक्यासह पडणार कडाक्याची थंडी...
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे. पहाडी भागांत बर्फवृष्टी सुरूच आहे. दरम्यान, देशातील अनेक भागात पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी तामिळनाडूच्या किनारपट्टी भागांत बुधवारपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. चेन्नई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच इतर किनारपट्टी भागांतही मुसळधार पावसाची नोंद झाली. तसेच, येत्या काही दिवसांत तिरुवल्लूर जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाजही आयएमडी अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
शहराच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर चेन्नईचा पारा घसरला असून किमान तापमान 22.7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. हे तापमाण सरासरी 29.3 अंश सेल्सिअसपेक्षा खूप कमी आहे. चेन्नईचे हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक बालचंद्रन म्हणाले, उत्तर किनारी प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मंगळवारीही राज्यातील अनेक भागांत हलका पाऊस पडेल. राज्यात खालच्या पातळीवरील पूर्वेकडील वारे आणि वरच्या पातळीवरील पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे पाऊस सुरू झाला आहे, असेही निवेदनात म्हणण्यात आले आहे.
देशातील या राज्यात पावसाची शक्यता -
याशिवाय, 17 जानेवारीपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागांत पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये पावसाची शक्यता आहे. याच बरोबर, रायलसीमा, तामिळनाडू आणि केरळमध्येही पुढील 4-5 दिवसांत पाऊस होऊ शकतो. IMD ने ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांतही पावसाचा इशारा दिला आहे.
देशातील या राज्यांत दाट धुक्यासह पडणार कडाक्याची थंडी -
येत्या दोन दिवसांत दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या वेगळ्या भागांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय, येत्या काही दिवसांत दिल्ली, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याचीही शक्यता आहे.