विवाह समारंभ संकटात
By admin | Published: November 13, 2016 03:25 AM2016-11-13T03:25:04+5:302016-11-13T03:25:04+5:30
मोदी सरकारने हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहार पूर्णत: ठप्प झाले आहेत. लोकांकडे जेवणासाठीही पैसे नाहीत. कोणी आजारी पडलेच
ग्रामीण भाग नोटांविना लोकांची ससेहोलपट
डुडको : मोदी सरकारने हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहार पूर्णत: ठप्प झाले आहेत. लोकांकडे जेवणासाठीही पैसे नाहीत. कोणी आजारी पडलेच तर रुग्णालयात जाणेही कठीण झाले आहे. अनेक गावांत विवाह समारंभही थांबले आहेत. राजधानी दिल्लीपासून सुमारे ७५ कि.मी. अंतरावर असलेले डुडको गाव हे याचे एक उत्तम उदाहरण ठरावे.
ग्रामीण भागातील सर्व आर्थिक व्यवहार रोखीनेच होतात. फारच थोड्या लोकांची बँकेत खाती आहेत. खाती असणारेही क्वचितच बँकांमार्फत व्यवहार करतात. रोखीच्या व्यवहारासाठी नोटाच नसल्यामुळे लोकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. डुडकोमध्ये एकच बँक आहे. या बँकेबाहेर गावकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली आहे. त्यात महिलांचा समावेश अधिक आहे. बँकेत नोटा आल्याचे कळताच लोक उतावीळ झाल्याचे दिसून येते. नोटा लवकरच संपून जातात.
सुनीता नावाच्या महिलेने सांगितले की, माझ्या मुलीचे येत्या १६ तारखेला लग्न आहे. लग्न सुखरूप पार पडेल की नाही, याची आम्हाला खात्री वाटत नाही. सोमवारी पैसे देतो असे बँक अधिकारी म्हणत आहेत. इतक्या कमी वेळात आम्ही तयारी कशी करणार?
रोखीच्या समस्या असल्या तरी डुडकोतील गावकरी नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत! प्रल्हाद सिंग नावाच्या एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, सरकारचा निर्णय चांगला आहे. आम्हाला एवढीच चिंता आहे की, ही समस्या अजून किती दिवस चालेल. चांद सिंग नावाच्या माजी सरपंचाने सांगितले की, नोटांची टंचाई ही छोटी समस्या आहे. ती लवकरच दूर होईल, असे वाटते. (वृत्तसंस्था)