संध्याकाळी विवाह, सकाळी घटस्फोट
By admin | Published: May 18, 2016 08:27 AM2016-05-18T08:27:47+5:302016-05-18T13:43:32+5:30
लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आयुष्यभर परस्परांना साथ द्यायची, सोबत करायची असे पती-पत्नी मनोमन ठरवतात. पण काहीवेळा अवतीभवती घडणा-या घटनांमुळे ही साथ, सोबत लवकरच संपते.
Next
ऑनलाइन लोकमत
बिजनोर, दि. १८ - लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आयुष्यभर परस्परांना साथ द्यायची, सोबत करायची असे पती-पत्नी मनोमन ठरवतात. पण काहीवेळा अवतीभवती घडणा-या घटनांमुळे ही साथ, सोबत लवकरच संपते. उत्तरप्रदेशातील बिजनोरमध्ये विवाहामंडपातच चोरीचा आरोप झाल्यामुळे लग्नानंतर लगेचच घटस्फोट झाल्याची एक घटना समोर आली आहे.
मंगळवारी बिजनोर जिल्हयातील कारोंडा पाचडू गावातील कारी इमरान यांची वरात शेजारच्या चंदपूरान गावी वधूच्या घरात दाखल झाली. वधू-वर पक्ष लग्न सोहळयामध्ये रमलेले असताना वधूच्या घरातून १.४५ लाख रुपये आणि दागिन्यांची चोरी झाली. वधू पक्षाने यासाठी संपूर्ण वरपक्षाला जबाबदार धरले.
वधूचे वडली नासीर अहमद यांनी वराच्या नातेवाईकांवर चोरीचा आरोप लावला. इतकेच नव्हे त्यांनी संपूर्ण वरपक्षाला बंधक बनवून ठेवले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सकाळी वर आणि त्याच्याबरोबर आलेल्या वरातीची सुटका केली.
या प्रकाराने संपातलेल्या नवरदेवाने सुटका होताच लगेच घटस्फोट झाल्याचे जाहीर केले. वराच्या नातेवाईकांनी चोरीचे आरोप फेटाळून लावले आहेत. उलट मुलीच्या नातेवाईकांनी गैरवर्तणूक केली आणि सर्वांना बंधक बनवून ठेवले असे म्हटले आहे. मला तलाक घ्यायचा नव्हता पण आमचा खूप अपमान झाला, मला तलाक घेण्यासाठी भाग पाडले असे इमरानने सांगितले.