महागाईने बिघडवले बँडबाजा-बारातचे बजेट; लग्नाच्या हंगामाला सुरुवात, देशभरात ४० लाख लग्नांचा बार उडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 02:22 PM2022-04-22T14:22:38+5:302022-04-22T14:23:36+5:30
यंदा वर आणि वधू या दोन्ही पक्षांवर महागाईचा मार बसण्याची शक्यता आहे. महागाईमुळे लग्नासाठी येणाऱ्या खर्चात जवळपास ३० टक्क्यांची मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.
नवी दिल्ली : देशात सध्या लग्नांचा हंगाम सुरू झाला असून, तो ९ जुलैपर्यंत चालू राहणार आहे. कोरोनापासून दिलासा मिळाल्यानंतर आता मोठ्या संख्येने लग्नांचा बार उडण्याची शक्यता आहे. ही संख्या ४० लाखांपेक्षा अधिक असून, यामुळे ५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने व्यक्त केली आहे.
यंदा वर आणि वधू या दोन्ही पक्षांवर महागाईचा मार बसण्याची शक्यता आहे. महागाईमुळे लग्नासाठी येणाऱ्या खर्चात जवळपास ३० टक्क्यांची मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. हॉल, केटरिंग, डेकोरेशन, वाहतूक, फुले, दागिने, कपडे महाग झाल्याने लग्नांमध्ये वधू आणि वर पक्षांचे खिसे बऱ्यापैकी रिकामे होणार आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. खुर्ची, स्टेज, तंबू यासह अनेक वस्तूंच्या भाड्यांमध्ये १० टक्केपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
चंदेरी साडीचा व्यवसाय चमकला
- राजघराण्यातील महिलांची शोभा वाढवणाऱ्या चंदेरी साडीचा व्यवसाय कोरोनानंतर वाढीस लागला आहे.
- कोरोना रुग्णांची कमी होत असलेली संख्या आणि लग्नांचा हंगाम सुरू झाल्यामुळे यावर्षी चंदेरी साडीचा व्यवसाय चमकला आहे.
- यावर्षी लग्न हंगाम आणि मुहूर्त अधिक असल्याने चंदेरी साडीच्या विक्रीत दुप्पट वाढ होण्याचा अंदाज आहे.
बँडबाजाही झाला अधिक महाग
गेल्यावर्षी ५०० रुपये प्लेटने मिळत असलेले जेवण यावेळी ८०० रुपये प्लेटवर पोहोचले आहे. बँड पार्टीसाठी ४० हजारांवर पैसे द्यावे लागत आहेत. मिठाई, भाज्या, अन्नधान्य महाग झाल्याने लग्नाचा खर्च आणखी वाढणार आहे.
खिसा होणार अधिक रिकामा
- ५०% वाढली रेशमची किंमत. यामुळे लग्नातील चंदेरी साडीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
- ५3 हजारांवर गेली आहे सोन्याची किंमत. यामुळे सोने-चांदीचे दागिने घेणे अधिक महाग झाले आहे.
- २५० कोटी व्यवसाय चंदेरी साडीमधून यंदा होण्याची शक्यता
- २०० कोटी चंदेरी साडी, सूट, कुर्ते कोरोनापूर्वी लग्न हंगामात विकले जात.