कन्हैयाच्या जामिनावर बुधवारी निर्णय
By admin | Published: March 1, 2016 03:12 AM2016-03-01T03:12:16+5:302016-03-01T03:12:16+5:30
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या(जेएनयू) विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या जामीन याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च
नवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या(जेएनयू) विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या जामीन याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी २ मार्चपर्यंत राखून ठेवला. दरम्यान याच प्रकरणात अटकेत असलेले अन्य दोन विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या पोलीस कोठडीत दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी आणखी एका दिवसाची वाढ केली.
कन्हैया व अन्य विद्यार्थ्यांना भारतविरोधी घोषणा देताना पाहणारा एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, असे दिल्ली पोलिसांनी न्या. प्रतिभा राणी यांच्या खंडपीठासमक्ष सांगितले. यानंतर न्यायालयाने कन्हैयाच्या जामिनावरील निर्णय २ मार्चपर्यंत लांबणीवर टाकला.
याचदरम्यान कन्हैया कुमार, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एसएआर गिलानी व अन्य काहींविरुद्ध दाखल अवमानना याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी अॅटर्नी जनरलचा सल्ला घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी याचिकाकर्त्यास दिले. अफजल गुरूच्या फाशीच्या शिक्षेला ‘न्यायिक हत्या’ म्हणणे ही शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे कन्हैया व अन्यविरुद्ध अवमानना कारवाई करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. तुम्हाला अॅटर्नी जनरला सल्ला घ्यावा लागेल. ही कायद्याची गरज आहे, असे खंडपीठाने म्हटले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)