Coronavirus : दिल्लीतही कोरोनाचा हाहाकार, वीकेंड कर्फ्यूची केजरीवाल यांची घोषणा; जिम, मॉल्स बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 02:00 PM2021-04-15T14:00:49+5:302021-04-15T14:02:48+5:30
दिल्लीतही या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. बेड्सची कमतरता नसल्याची केजरीवाल यांची माहिती.
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी आपापल्या पातळीवर निर्बंधांची घोषणा केली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध घातले आहेत. तर दुसरीकडे अन्य राज्यांमध्येही काही निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्लीतही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिल्लीत वीकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत आज घोषणा केली.
वीकेंज कर्फ्यू हा शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली. वीकेंड कर्फ्यूदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसंच ज्यांच्या लग्नाच्या तारखा यादरम्यान निश्चित आहेत त्यांना पास दिले जातील. याशिवाय जिम, मॉल, स्पा, बाजार आणि अन्य ठिकाणं बंद ठेवण्यात येतील. याशिवाय चित्रपटगृहं ३० टक्के प्रमाणात सुरू राहिल, असं केजरीवाल यांनी नमूद केलं.
WEEKEND CURFEW IN DELHI!
— AAP (@AamAadmiParty) April 15, 2021
Only essential services to operate
Curfew passes for marriages & other permitted activities
Gym, pools, malls, to be closed
Cinema halls allowed at 30% capacity
1 weekly market allowed per day per zone
Only Take-aways; No Dine in restaurants pic.twitter.com/6MxXJJ12uq
आठवड्याच्या अखेरिस केवळ ठिकाणांच्या हिशोबानं बाजार उघडले जातील. लोकांनी आठवड्यातील पाच दिवस काम करावं. परंतु वीकेंडला घरातच राहण्याचे प्रयत्न करावे. जर कोणाला रुग्णालय, विमानतळ, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन आदि ठिकाणी जायचं असेल तर यादरम्यान त्यांना सूट दिली जाईल. परंतु यासाठी त्यांना पास घ्यावा लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बेड्सची कमतरता नाही
"दिल्लीत सध्या बेड्सची कमतरता नाही. काही रुग्णालयांमधील बेड्स भरले आहेत. परंतु काही लोकांना त्याच रुग्णालयात जायचं आहे म्हणून काही समस्या उद्भ्वत आहेत. जे कोणी आजारी असतील त्यांचा जीव वाचवावा हे आमचं प्राधान्य आहे. दिल्लीत आताही पाच हजारांपेक्षा अधिक बेड्स रिकामे आहेत आणि त्यांची संख्याही वाढवली जात आहे," असं केजरीवाल म्हणाले.