वेलकम 2023..., देशभर मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 06:10 AM2023-01-01T06:10:59+5:302023-01-01T06:11:27+5:30

ठिकठिकाणी नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून आला.

Welcome 2023..., welcome the new year with joy all over the country | वेलकम 2023..., देशभर मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत

वेलकम 2023..., देशभर मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत

googlenewsNext

मुंबई : राज्यासह देशभरातील नागरिकांनी सरत्या २०२२ ला निरोप देत २०२३ चं जल्लोषात स्वागत केलं आहे. ठिकठिकाणी नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून आला. मुंबई, पुणे, बंगळुरु, गोवा आणि दिल्लीमध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. आकर्षक रोषणाईत न्हाऊन निघालेल्या मुंबईतील पर्यटनस्थळांच्या परिसरात फटाक्यांच्या आतषबाजीत वर्षांरंभाचा जल्लोष करण्यात आला. अनेक मुंबईकरांनी शहरातल्या नेहमीच्या गजबजाटापासून दूर पर्यटनस्थळी जाऊन नववर्षांचे स्वागत केलं. मुंबईत अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. मुंबई पोलीस दलाकडून नववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमात अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


नवी दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये लोक मोठ्या संख्येनं नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमा झाले होते. गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्यानं दिल्ली पोलिसांना गर्दी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले. उत्तराखंडच्या मसुरीमध्ये रोषणाई, संगीत आणि नृत्याच्या तालावर तरुणाईनं स्वागत केलं. कोच्चीच्या फोर्टमध्ये नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या लोक जमले होते. तसेच, येथील कोचीन कार्निवलमध्ये मोठ्या संख्येन लोक जमा झाले होते. हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणी नागरिकांनी स्वागत केलं. गोवा आणि मनालीमध्ये लोक आणि पर्यटक मोठ्या संख्येनं जमले होते. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्येही मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.


पुणे शहर आणि उपनगरांमधील रस्त्यांवर नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून आली. शहरातील रस्त्यांवर रंगेबेरंगी फुगे, लाइट लावण्यात आले होते. फटाक्यांची आतिषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आलं. दुसरीकडे, लोणावळा, अलिबागसह रायगड आणि पालघरमधील समुद्र किनारे, महाबळेश्वर, पाचगणी आदी ठिकाणी ठाणेकर आणि मुंबईकरांची कुटुंबे शुक्रवारीच दाखल झाली होती. तर काही नोकरदारांनी शनिवारी कुटुंबासह पर्यटन स्थळांकडे कूच केल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र होतं. या पर्यटनस्थळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सरत्या वर्षांला निरोप दिला आणि रात्री उत्फुल्ल उत्साहात नव्या वर्षांचे स्वागत केलं.


जगभरात जल्लोषात स्वागत
जगभरात अनेक देशांमध्ये मोठ्या जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. लोकांनी नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. ऑस्ट्रेलियाला 'लँड डाउन अंडर' म्हणून ओळखले जाते. येथेही फटाक्यांची आतषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सिडनी हार्बरभोवती प्रेक्षकांची गर्दी जमली होती. सिडनी ऑपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिजवर फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले. तर न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. ऑकलंडमधील स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. ऑकलंडमधील स्काय टॉवरच्या खाली लोक जमले जेथे 2023 चे स्वागत करण्यासाठी फटाके पेटवले जात आहेत. ही कामगिरी मध्यरात्री 10 सेकंद आधी सुरू होते. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.



 

Web Title: Welcome 2023..., welcome the new year with joy all over the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.