स्वागत आहे भावा... चंद्राजवळ ‘बंधु’भेट! ‘चंद्रयान-२’चा ‘चंद्रयान-३’शी झाला संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 06:36 AM2023-08-22T06:36:45+5:302023-08-22T06:37:20+5:30
२०१९मध्ये पाठविलेल्या ‘चंद्रयान-२’चा ‘चंद्रयान-३’च्या लँडर मॉड्यूलशी संपर्क स्थापित
बंगळुरू : चंद्राच्या दिशेने दाेन मित्र झेपावले. एक प्रचंड वेगाने, तर दुसरा संथ पण संयमी वेगाने गेला. पहिला भरकटला आणि काेसळला. आता दुसऱ्याकडे म्हणजेच भारताच्या ‘चंद्रयान-३’कडे अख्ख्या जगाचे लक्ष असून, त्याला त्याच्या भावाचीही साथ मिळाली आहे. चंद्रयान-२ ऑर्बिटर आणि चंद्रयान-३ च्या लँडर मॉड्यूलमध्ये i संपर्क स्थापित झाला आणि दोन भाऊ खूप वर्षांनी भेटल्यानंतर हाेते तसे वातावरण निर्माण झाले (चंद्रावर वातावरण नसले तरी..). मग चंद्रयान-२ च्या ऑर्बिटरनेही ‘वेलकम बडी’ (स्वागत आहे भावा!) असे म्हणत चंद्रयान-३ लँडर मॉड्युलचे स्वागत केले.
मोहीम जेथून नियंत्रित केली जात आहे त्या केंद्रातून (एमओएक्स) आता लँडरपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाल्याचे इस्राेने म्हटले आहे. चंद्रावर उतरण्यासाठी लॅंडरने माेक्याची जागा शाेधण्यास सुरूवात केली आहे. (वृत्तसंस्था)
थेट प्रक्षेपण पाहता येणार
- चंद्रयान -३ चे बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्रावर लॅण्डिंग होणार आहे. इस्रोकडून त्याचे थेट प्रक्षेपण हाेणार आहे.
- इस्रोच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरून चंद्रयान-३ चे लॅण्डिंग पाहता येणार आहे.
- www.isro.gov.in/LIVE_telecast_of_Soft_landing.html
ऑर्बिटरचे आयुष्य सात वर्षांनी वाढले...
ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर यांचा समावेश असलेले चंद्रयान-२ अंतराळयान २०१९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. सॉफ्ट-लँडिंग साध्य करण्यात ते अयशस्वी ठरले तरी अचूक प्रक्षेपण आणि कक्षा बदलांमुळे ऑर्बिटरचे आयुष्य सात वर्षांपर्यंत वाढल्याचे तेव्हा इस्रोने जाहीर केले होते.
लँडिंग आधीचे दोन तास भवितव्यासाठी महत्त्वाचे
येत्या बुधवारी, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वीचे दोन तास चंद्रयान-३ चे भवितव्य ठरविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. चंद्रावरील स्थिती व इतर घटकांचा विचार करून चंद्रयान-३ लँडिंगबाबत योग्य निर्णय घेतला जाईल किंवा २३ ऑगस्टऐवजी २७ ऑगस्टला लँडिंगची प्रक्रिया पार पाडली जाईल, असे इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश देसाई यांनी सांगितले.
‘३० किमी अंतरावर बारीक लक्ष’
चंद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याआधीचे तीस किमी अंतर हे अतिशय महत्त्वाचे आहे. अंतराळातील परिस्थिती गुंतागुंतीची असते; पण चंद्रयान-३चे लँडिंग यशस्वी होणार याबद्दल आम्हाला खात्री आहे, असे खगोलशास्त्रज्ञ व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सच्या संचालक अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांनी सांगितले.
चंद्रयान-३ ची लँडिंग प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. आम्ही ते (चंद्रयान-२ मोहिमेतील चंद्रावर सॉफ्ट लँडिंग) शेवटचे दोन किलोमीटरमध्ये (चंद्राच्या पृष्ठभागाच्या वर) यशस्वीरीत्या करू शकलो नव्हतो. इस्रोने पुरेशी तयारी केली आहे, जेणेकरून अपयशाची शक्यता कमी आहे. तरीही, आपल्याला आपल्या बाजूने प्रार्थना करावी लागेल. - माधवन नायर, माजी इस्रो प्रमुख