काही देशांकडून विदेशी पर्यटकांचे स्वागत; अमेरिका, फ्रान्समध्ये भारतीय पर्यटकांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 06:25 AM2021-06-20T06:25:38+5:302021-06-20T06:25:45+5:30

जगभरातील पर्यटनाला मोठा फटका बसला होता. त्यातून आता हा व्यवसाय हळूहळू सावरत आहे.

Welcome of foreign tourists from some countries; US and France bans Indian tourists | काही देशांकडून विदेशी पर्यटकांचे स्वागत; अमेरिका, फ्रान्समध्ये भारतीय पर्यटकांना बंदी

काही देशांकडून विदेशी पर्यटकांचे स्वागत; अमेरिका, फ्रान्समध्ये भारतीय पर्यटकांना बंदी

Next

नवी दिल्ली : कोरोना साथीची तीव्रता कमी होऊ लागल्यानंतर जगातील काही देशांनी विदेशी पर्यटकांचे स्वागत करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका, फ्रान्स, स्पेनसारख्या देशांनी युरोपातील देशांतल्या पर्यटकांना प्रथम पसंती दिली असून, भारतातील पर्यटकांना मात्र तिथे अद्यापही बंदी आहे, तर रशिया, तुर्कस्थान, थायलंडसारख्या देशांत भारतातून येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश देण्यात येत आहे.

या साथीमुळे जगभरातील पर्यटनाला मोठा फटका बसला होता. त्यातून आता हा व्यवसाय हळूहळू सावरत आहे. फ्रान्समध्ये फायझर, अ‍ॅस्ट्राझेनेका, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांची लस घेतलेल्या विदेशी पर्यटकांना प्रवेश देण्यात येतो. तिथे येण्यापूर्वी ७२ तास आधी त्या पर्यटकाने पीसीआर चाचणी करणे व तिचा निष्कर्ष निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. फ्रान्सने भारतासह १६ देशांतील पर्यटकांना प्रवेशबंदी केली आहे. त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझीलचाही समावेश आहे. इटलीने अमेरिका, युरोपीय, तसेच अन्य काही देशांतील पर्यटकांना येण्याची परवानगी दिली. 

ग्रीसमध्ये अमेरिका, चीनसह २० देशांतील लोक  जाऊ शकतात. स्पेनला भेट देणाऱ्याने त्याच्या दोन आठवडे आधी युरोपीय समुदायाने संमती दिलेल्यापैकी कोणतीही लस किंवा जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या चीनच्या दोन लसींपैकी एक लस घेतलेली असणे आवश्यक आहे. तिथे भारत, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमधील पर्यटकांना मात्र बंदी आहे. ब्रिटनमध्येही भारतीय पर्यटकांना बंदी आहे. मात्र, युरोपीय देश, अमेरिकेसाठी उदार दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. 

थायलंडनेही उघडले दार-

रशियामध्ये भारतीय नागरिक पर्यटनासाठी जाऊ शकतात; पण त्याआधी त्यांनी कोरोना चाचणी करून घेणे व तिचा निष्कर्ष निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. भारतासह सर्वच देशांतील ज्या पर्यटकांनी कोरोना लस घेतली आहे, अशांना थायलंडमध्ये भटकंतीसाठी जाता येईल. मात्र, त्यांनी फुकेत येथे सात दिवस राहून मगच थायलंडमध्ये अन्यत्र प्रवास करावा, अशी अट घालण्यात आली आहे. भारतीय पर्यटक दरवर्षी लाखोंच्या संख्येने थायलंडला जातात. कोरोनामुळे हे प्रमाण कमी झाले होते.

Web Title: Welcome of foreign tourists from some countries; US and France bans Indian tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.