एअर इंडियामध्ये प्रवाशांचे ‘जय हिंद’ने स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2016 03:59 AM2016-05-23T03:59:23+5:302016-05-23T08:17:17+5:30

एअर इंडियाच्या विमानांना होणाऱ्या विलंबामुळे असंख्य तक्रारींची भर पडत असताना प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दाखविली जाणारी असंवेदनशीलता किंवा आदरातिथ्याचा अभाव यापुढे दिसणार नाही

Welcome to Jai Hind, passengers of Air India | एअर इंडियामध्ये प्रवाशांचे ‘जय हिंद’ने स्वागत

एअर इंडियामध्ये प्रवाशांचे ‘जय हिंद’ने स्वागत

Next

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानांना होणाऱ्या विलंबामुळे असंख्य तक्रारींची भर पडत असताना प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दाखविली जाणारी असंवेदनशीलता किंवा आदरातिथ्याचा अभाव यापुढे दिसणार नाही. प्रवाशांना सभ्यतेची वागणूक देत ‘जय हिंद’ या शब्दाने त्यांचे स्वागत करीत राष्ट्रीय भावनेला बळकटी देण्याचा या शासकीय विमान कंपनीचा उद्देश असेल.
एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी यांनी अलीकडेच फ्लाईट कमांडर्सना उद्देशून पाठविलेल्या शब्दांत ‘जय हिंद’ हा शब्द वापरण्याबाबत उल्लेख केला आहे. कमांडर्सनी प्रवाशांशी सातत्याने जोडले राहावे. पहिल्यांदा संवाद साधताना जय हिंदने सुरुवात केली तर त्याचा चांगला प्रभाव पडू शकेल, असे लोहानी यांनी नमूद केले. लोहानी यांनी नुकसानीत असलेल्या एअर इंडियाची नफा कमावण्याच्या दिशेने वाटचाल चालविली आहे. विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसोबत सभ्यतेने वागावे. चेहरा हसतमुख असावा. प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना चांगला अनुभव यावा यासाठी खबरदारी घेतली जावी, अशी सूचनाही लोहानी यांनी दीर्घ पत्रात केली आहे. (वृत्तसंस्था)
 

विलंब आणि गैरसोयीमुळे प्रतिमेवर परिणाम...
अलीकडे एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना वाईट अनुभव येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: अपंगांना होणारा त्रास किंवा अन्नाचा निकृष्ट दर्जा, कर्मचाऱ्यांमधील भांडणांतून होणाऱ्या विलंबामुळे या विमान कंपनीच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. विमान कर्मचारी उड्डाणाच्या वेळी आणि उतरताना ‘नमस्कार’ हा शब्द पारंपरिकरीत्या वापरत आले आहेत. या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसोबत वाद न घालता किंवा कोणताही त्रागा न करता चेहऱ्यावर हसू ठेवत सभ्यतेची वागणूक द्यावी. आवाजात गोडवा असावा, असे लोहानी यांना वाटते.

अर्ध्या तासापेक्षा जास्त विलंब नको...
विमान धावपट्टीवर असताना (एओजी) अर्ध्या तासापेक्षा विलंब होत असल्यास विमानतळ व्यवस्थापक किंवा स्थानक व्यवस्थापकाने तातडीने घटनास्थळी जाऊन प्रवाशांना त्याबाबत माहिती द्यावी. प्रवाशांसोबत पुरेसा सुसंवाद साधतानाच त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेची विनाविलंब काळजी घेतली जावी. प्रवाशांच्या समस्या सोडवताना या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन अवलंबावा, असेही लोहानी यांनी संदेशात नमूद केले आहे.

Web Title: Welcome to Jai Hind, passengers of Air India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.