मोदींचा रोड शो आणि योध्याप्रमाणे स्वागत!
By Admin | Published: March 13, 2017 12:49 AM2017-03-13T00:49:18+5:302017-03-13T00:49:18+5:30
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भाजपा मुख्यालयात आले तेव्हा त्यांचे एखाद्या योध्याप्रमाणे स्वागत केले गेले
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भाजपा मुख्यालयात आले तेव्हा त्यांचे एखाद्या योध्याप्रमाणे स्वागत केले गेले. निमित्त होते भाजपाच्या विजय यात्रेचे, पण प्रत्यक्षात तो खास मोदी स्टाईलचा रोड शो झाला.
११, अशोका रोडवरील भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात रविवारी सकाळपासून उत्सवी वातावरण होते. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. ढोल नगाऱ्यांच्या तालावर होळीचे रंग उधळत सकाळपासून ते नाचत होते. एकमेकांना मिठाई
भरवीत होते.
दुपारपासून गर्दी वाढू लागली. पोलीस बंदोबस्त वाढला. अशोका रोड पूर्णत: मोकळा करण्यात आला. दिल्ली, राजस्थान हरयाणातून आलेल्या पक्ष कार्यक र्त्यांची गर्दी इथे उसळली होती. या गर्दीला दोन्ही बाजूंच्या पदपथांवर बॅरिकडेच्या मागे सारून थोपवण्यात आले. उपस्थितांना संबोधित करण्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. मुख्यालयाच्या आत मोदी पोहोचले तेव्हा त्यांची एक झलक टिपण्यासाठी सर्वांची जणू स्पर्धा लागली होती.
सायंकाळी सव्वा सहा वाजता विंडसर प्लेसवरील ली मेरिडियन हॉटेलपासून भाजपची विजय यात्रा सुरू झाली. एका भव्य रथावर मोदी आणि अमित शाह यांचे भलेमोठे कटआऊ ट सजवले होते.
यात्रेत विजयाचे मुख्य शिल्पकार पंतप्रधान
मोदींनी, सुरूवातीचे काही अंतर कारने पार केले. यात्रेचा काफिला अशोका रोडवर पोहोचताच,
हरहर मोदी... वंदे मातरम, घोषणांचा जयघोष
सुरू झाला.
जवळपास २00 मीटर अंतर पायी चालत, रस्त्याच्या दुतर्फा उभ्या कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करीत, मोदी विजयी योध्याच्या आवेशात मुख्यालयात पोहोचले. मोदी व अमित शाह यांच्या स्वागतासाठी इथे जय्यत तयारी करण्यात होती.