शाब्बास मुली! बालविवाह माेडला अन् १२ वीत टॉपर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:18 AM2024-04-15T05:18:36+5:302024-04-15T05:21:23+5:30
जर तुमच्यात काही करण्याची जिद्द असेल, तर यश नक्कीच तुमच्या मागे येईल.
जर तुमच्यात काही करण्याची जिद्द असेल, तर यश नक्कीच तुमच्या मागे येईल. अशीच एका धाडसी मुलीची गोष्ट असून, तिने घरी बालविवाहाची तयारी सुरू असताना तो थांबविला आणि प्रचंड अभ्यास करून ती आंध्र प्रदेशमध्ये बारावीच्या परीक्षेत टॉपर आली आहे. त्यामुळे ती देशातील मुलींसाठी हीरो बनली आहे. आई-वडील गरीब असल्याने त्यांच्याकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांची मुलगी एस. निर्मला हिचा बालविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, निर्मलाने बालविवाह थांबवला आणि अभ्यास करून ती टॉपर आली. आई-वडिलांनी तिच्या ३ बहिणींचे यापूर्वी लग्न लावून दिले होते आणि निर्मलाचेही लग्न करून आपल्या डोक्यावरील ओझे हलके करायचे होते; पण निर्मलाने हिंमत सोडली नाही. ती खंबीरपणे उभी राहिली आणि तिच्या स्वप्नांसाठी लढली.
निर्मलाने १२ वीच्या परीक्षेत टॉप केले असून, पहिल्या वर्षाच्या इंटरमिजिएट बोर्डाच्या परीक्षेत तिला ९५.७% गुण मिळाले. निर्मलाला ४४० पैकी ४२१ गुण मिळाले आहेत. निर्मलाच्या गावात आणि आसपास एकही ज्युनिअर कॉलेज नव्हते. तरीही तिने कॉलेजला जाण्यासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास केला. पालकांना शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने तिने शिकवणी घेत खर्च केला.
आता आयपीएस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न असून, तिला बालविवाह रोखण्यासाठी काम करायचे आहे. मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करून त्यांना सक्षम बनवण्याचा माझा प्रयत्न असेल असे तिने सांगितले. जेव्हा तिचे आई-वडील तिचे लग्न करण्यावर ठाम होते, तेव्हा तिने थेट स्थानिक आमदाराची भेट घेतली. यानंतर जिल्हाधिकारी जी. सृजना यांनी हस्तक्षेप करत बालविवाह रोखला होता.