नीट, जेईई स्थगित करा; दिल्लीत ‘एनएसयूआय’चे बेमुदत उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 01:17 AM2020-08-27T01:17:43+5:302020-08-27T01:18:13+5:30
कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईई परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करीत बुधवारी भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शास्त्री भवननजीक निदर्शने केली.
नवी दिल्ली : नीट, जेईई परीक्षा स्थगित करावी आणि कोरोना साथीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांचे शुल्क माफ करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने (एनएसयूआय) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नीट आणि जेईई परीक्षा स्थगित करण्याची मागणी करीत बुधवारी दिल्लीत शास्त्री भवननजीक निदर्शने केली.
काँग्रेसशी संलग्न असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियाचे (एनएसयूआय) अध्यक्ष नीरज कुंदन आणि दिल्ली शाखेच्या अध्यक्षांनी अन्य आठ सदस्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोविड-१९ च्या साथीदरम्यान विद्यापीठांनी परीक्षा घेऊ नयेत, अशीही त्यांची मागणी आहे. नीट आणि जेईई परीक्षा स्थगित करावी आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या कामगिरीच्या आधारे बढती देण्यात यावी, अशी मागणी एनएसयूआयने मागच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केली होती.
कोरोना साथीमुळे विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेऊन राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही नीट आणि जेईई परीक्षा स्थगित करण्याची विनंती सरकारला केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला नीट आणि जेईई परीक्षा रद्द करण्याचे आवाहन केले आहे.
युवक काँग्रेसची निदर्शने...
कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईई परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करीत बुधवारी भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शास्त्री भवननजीक निदर्शने केली. निवेदन देण्यासाठी शास्त्री भवनातील शिक्षण मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेले, असे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रसिद्धी सल्लागार राहुल राव यांनी सांगितले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी सांगितले की, लाखो विद्यार्थ्यांचे हित आणि सुरक्षेचा विचार करून केंद्र सरकारने परीक्षा स्थगित करावी. परीक्षा घेणे आवश्यक आहे; परंतु लाखो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेतली जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.