तक्रार दाखल करायला गेले,अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले; पोलिसांनी CPR देऊन प्राण वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 01:58 PM2024-09-24T13:58:21+5:302024-09-24T14:05:18+5:30
उत्तर प्रदेशातील एका पोलिस ठाण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक वयस्क व्यक्ती अचानक कोसळल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका पोलिस ठाण्यात एका वयस्क व्यक्तीचे पोलिसांच्या तत्परतेमुळे प्राण वाचले आहे. वेळीच पोलिसांनी त्या व्यक्तीला सीपीआर दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका वृद्धाचे प्राण तेथे उपस्थित असलेल्या दोन पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचवल्याचे दिसत आहे. वृद्धाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते तिथेच कोसळले. कोणाला काही समजण्याआधीच टेबलच्या पलीकडून आसलेल्या पोलिसांनी त्यांना सीपीआर द्यायला सुरुवात केली. सुमारे एक मिनिट या वृद्धाला सीपीआर देण्यात आला. वृद्धाचा जीव वाचला.
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या...
पोलीस ठाण्यात सीपीआर देण्याची ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि व्हॉट्सॲपवर शेअर केला आहे. रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन वृद्ध आग्राच्या जीआरपी पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी कॉन्स्टेबल राकेश कुमार आणि कॉन्स्टेबल रवेंद्र चौधरी हे ड्युटीवर होते. त्या वृद्धाचा मोबाईल कुठेतरी पडल्याचे वृद्धाने सांगितले.वृद्धाने तक्रार लिहून दिली. त्यांना रिसिव्हिंग देण्यासाठी कॉन्स्टेबल रवेंद्र चौधरी रिपोर्ट दाखल करत होते. यादरम्यान तो व्यक्ती अचानक खाली पडला.
हवालदार रवेंद्र आणि राकेश यांनी वृद्ध व्यक्तीला जमिनीवर पडताना पाहिल्यानंतर दोघेही काही काळ स्तब्ध झाले. पण वृध्दाला हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांना समजले, वेळ न दवडता त्यांनी ताबडतोब सीपीआर देण्यास सुरुवात केली. सुमारे एक मिनिट या वृद्धाला सीपीआर देण्यात आला.
वृद्ध व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्तीही यावेळी मदतीसाठी हतबल दिसत आहे. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला पाण्याची बाटली दिली आणि पोलिसांनी त्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. १ मिनिट ३८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हा वृद्धाची तब्येत सुधरल्याचे दिसत आहे.