काढायला गेला 100 रुपये, खात्यात आढळले 2700 कोटी; वीटभट्टी कामगार काही तासांसाठी झाला कोट्यधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 06:54 AM2022-08-04T06:54:19+5:302022-08-04T06:54:33+5:30
एकाच वेळी खात्यात जमा झालेली एवढी रक्कम पाहून त्याच्याही आनंदाला पारावार उरला नाही. मजुराचा विश्वासच बसेना.
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नौज : उत्तर प्रदेशात एक वीटभट्टी कामगार अचानक कोट्यधीश झाला. त्याच्या खात्यात एकूण २७०० कोटी रुपये जमा झाले. विशेष म्हणजे हा मजूर दिवसाला ६०० ते ८०० रुपये कमावतो. एकाच वेळी खात्यात जमा झालेली एवढी रक्कम पाहून त्याच्याही आनंदाला पारावार उरला नाही. मजुराचा विश्वासच बसेना. अनेकदा त्याने खाते तपासून खात्री केली. मात्र, मजुराचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. तो बँकेत पोहोचेपर्यंत खात्यात १२६ रुपये शिल्लक होते.
तीन वेळेस तपासले खाते
सोमवारी त्यांनी गावातील जन सेवा केंद्रातून आपल्या जनधन खात्यामधील १०० रुपये काढले. काही वेळाने त्यांच्या फोनवर मेसेज आला. ज्यामध्ये २७०० कोटी रुपये खात्यातील शिल्लक रक्कम असल्याचे लिहिले होते.
बिहारी लाल यांनी ताबडतोब जवळच्या बँक मित्राकडे जाऊन खाते तपासले. बँक मित्रानेही, खात्यात प्रत्यक्षात २७०० कोटी रुपये जमा आहेत, असे सांगितले. तरी त्यांना विश्वास बसत नव्हता.
बिहारीलाल म्हणाले, ‘मी खाते पुन्हा तपासण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी तीन वेळेस तपासणी केली. माझा विश्वास बसेना, तेव्हा त्यांनी बँकेचे स्टेटमेंट काढून मला दिले. त्यावर माझ्या खात्यात २७,०७,८५,१३,९८५ कोटी रुपये असल्याचे नमूद होते.
४५ वर्षांचा बिहारी लाल या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरासोबत ही घटना घडली. ते राजस्थानमध्ये एका भट्टीवर काम करतात. पावसाळ्यामुळे वीटभट्टीचे काम बंद असल्यामुळे सध्या ते उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात आपल्या घरी आहेत. त्यांचे बँक ऑफ इंडियामध्ये जनधन खाते आहे.
काही तासच टिकला आनंद
तथापि, त्यांचा आनंद काही तासच टिकला, कारण आपले खाते तपासण्यासाठी बँकेच्या शाखेत पोहोचल्यावर शिल्लक रक्कम फक्त १२६ रुपये आहे, असे त्यांना सांगण्यात आले.
बँकेने काय म्हटलं?
त्यानंतर बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक अभिषेक सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले की, खाते तपासले असता त्यात केवळ १२६ रुपये होते. ते म्हणाले, ही स्पष्टपणे बँकिंग त्रुटी असू शकते. बिहारीलाल यांचे खाते काही काळासाठी गोठवण्यात आले असून, ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.