आम्ही घाबरलेलो नाही : चिनी नौदलाच्या युद्ध सज्जतेच्या वृत्तावर अमेरिकेचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 12:49 AM2020-07-07T00:49:08+5:302020-07-07T00:50:15+5:30
चिनी नौदलाच्या युद्ध सज्जतेबाबत चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने एका टष्ट्वीटमध्ये कथित जाणकारांच्या हवाल्याने अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.
नवी दिल्ली : चीनच्या सरकारी दैनिकाने चिनी नौदलाच्या युद्ध सज्जतेबाबत दिलेल्या वृत्तावर अमेरिकेने चीनला चिमटा काढला आहे. याबाबत अमेरिकी नौदलाने म्हटले की, ‘आम्ही घाबरलेलो नाही’.
चिनी नौदलाच्या युद्ध सज्जतेबाबत चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने एका टष्ट्वीटमध्ये कथित जाणकारांच्या हवाल्याने अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. या टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘चीनकडे विमानवाहू नौकाविरोधी डीएफ-२१डी आणि डीएफ-२६ यासारखी ‘एअरक्राफ्ट कॅरिअर किलर’ आहेत. दक्षिण चीन समुद्र पूर्णत: ‘पीएलए’च्या (चिनी लष्कर) निगराणीत आहे. अमेरिकेच्या कोणत्याही विमानवाहू नौकेची या परिसरातील हालचाल ‘पीएलए’साठी सुखकारक बाब असेल : विश्लेषकांचे मत.’ या टष्ट्वीटला प्रत्युत्तर देताना अमेरिकी नौदलाच्या मुख्य माहिती अधिकाऱ्याने एक टष्ट्वीट केले आहे. त्यात म्हटले की, ‘असे असूनही ते तेथे आहेत. दोन अमेरिकी नौदलाच्या विमानवाहू नौका दक्षिण चीन समुद्रातील आंतरराष्ट्रीय हद्दीत परिचालन करीत आहेत. यूएसएस निमिट्झ आणि यूएसएस रोनाल्ड रिगन घाबरलेल्या नाहीत’. या टष्ट्वीटला अमेरिकी अधिकाºयाने ग्लोबल टाइम्सचा रिपोर्ट टॅग केलाआहे. त्याला ‘अॅटअवरडिस्क्रेशन’ असा हॅशटॅग दिला आहे.
सरावासाठी युद्धनौका पाठविल्या चीन सागरात
यूएसएस निमिट्झ आणि यूएसएस रोनाल्ड रिगन ही अमेरिकेच्या युद्ध नौकांची नावे असून या युद्ध नौका सध्या दक्षिण चीन सागरात आहेत. लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी या युद्ध नौका अमेरिकेने दक्षिण चीन सागरात पाठविल्या आहेत.
अमेरिकेचा हा युद्धाभ्यास दीर्घकाळापासून नियोजनात होता. चीनने वादग्रस्त ‘पार्सल आयलँड’जवळ लष्करी सराव आयोजित केल्यानंतर अमेरिकेनेही तातडीने आपल्या लष्करी सरावाच्या निमित्ताने दोन्ही नौका या भागात पाठविल्या.
अलीकडील काही दिवसांपासून चीनने आपल्या लष्करी हालचाली आक्रमक केल्या आहेत. भारतीय सीमेवरही चीनकडून खोडसाळ कारवाया सुरू आहेत. दक्षिण चीन समुद्रातील आपल्या कारवायांत अमेरिकेचा हस्तक्षेप टाळण्यासाठी चीनकडून आक्रमक हालचाली केल्या जात असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.