पश्चिम बंगालमध्ये बस दरीत कोसळून 36 जणांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 23:16 IST2018-01-29T23:10:03+5:302018-01-29T23:16:26+5:30
प्रवाशांनी गच्च भरलेली बस पुलावरून नदीत कोसळून किमान 36 जण बुडाल्याची घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी घडली. मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.

पश्चिम बंगालमध्ये बस दरीत कोसळून 36 जणांचा बुडून मृत्यू
कोलकाता : प्रवाशांनी गच्च भरलेली बस पुलावरून नदीत कोसळून किमान 36 जण बुडाल्याची घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी घडली. आपत्कालीन विभागानं बचावकार्य राबवले जात असून, मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बसमध्ये 56 प्रवासी होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्यात उशीर झाल्यामुळे संतप्त लोकांनी पोलिसांची गाडी पेटवून दिली. त्यामुळे पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. लोकांनी पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत. स्थानिक लोकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्न करणा-या अग्निशमन दलाच्या गाड्यांचंही नुकसान केलं आहे. पोलिसांनी जमावावर लाठीचार्जही केला आहे. काही लोकांचा मृत्यू हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही बस शिक्रापूरहून मालदाकडे जात होती. अपघातावेळी जास्त करून लोक निद्राधीन होते. त्यामुळेच अनेकांचा मृत्यू झाला आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 50 ते 60 माणसे होती. तरीही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.