बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 08:07 AM2020-06-09T08:07:06+5:302020-06-09T08:08:08+5:30
बिहारमध्ये भाजपाने राज्यातील ७२ हजार बूथवर ७२ हजार एलईडी स्क्रीन लावल्या होत्या. बंगालमध्येही अशीच तयारी करण्यात आली आहे.
कोलकाता : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे देशातील निवडणुकांचा चेहरा मोहराच बदलला आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेता येणार नाहीत. यामुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली आहे. बिहारनंतर अमित शहा आजपासून व्हर्च्युअल रॅलीने पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षीच्या सुरुवातील निवडणूक होणार आहे. मात्र, भाजपा आतापासूनच कामाला लागली आहे. बिहारमध्ये भाजपाच्या पाठिंब्याचे जदयूच्या नितिश कुमारांचे सरकार आहे. यामुळे तिथे प्रचाराची फारशी गरज नसली तरीही दगाफटका झाल्यास तयारी हवी म्हणून शहांनी पहिली व्हर्च्युअल रॅली घेतली आहे. आता मोर्चा कधीही हाती न आलेल्या प. बंगालकडे वळविला आहे.
अमित शहा वेगवेगळ्या मिडीया प्लॅटफॉर्मवरून ११ वाजता भाजपाच्या कार्यर्त्यांसह सामान्य़ मतदारांशी संवाद साधणार आहेत. या रॅलीमध्ये तेथील भाजपाचे वरिष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत. बंगाल बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले की, ही रॅली राज्यातील राजकीय वातावरणच बदलून टाकणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठीची ही पहिली रॅली असणार आहे. यामध्ये अधिकाधिक लोकांना सहभागी करून जागतिक रेकॉर्ड बनविण्याचा प्रयत्न आहे.
बिहारमध्ये काय केले होते?
बिहारमध्ये भाजपाने राज्यातील ७२ हजार बूथवर ७२ हजार एलईडी स्क्रीन लावल्या होत्या. बंगालमध्येही अशीच तयारी करण्यात आली आहे. ही रॅली अशासाठीही महत्वाची आहे की, गेल्या दोन् तीन महिन्यांनंतर पहिलीच राजकीय घडामोड घडत आहे. बंगालमध्ये ८० हजार बूथ आहेत. तर भाजपाचे ६५ हजार बूथवर अस्तित्व आहे. प्रत्येक बुथ कमिटीमध्ये ५ सदस्य आहेत. तर सरासरी १० ते १५ सदस्य आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी ही रॅली पाहिली तर ५ लाखांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत. तसेच २५ हजारावर व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत. त्यावरही रॅलीची जाहिरातबाजी करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय नाही त्यांना मोबाईलनंबर देण्यात आला आहे. याद्वारे ते भाषण ऐकू शकणार आहेत.