भाजप पश्चिम बंगालमध्ये 'योगी मॉडेल'ने देणार ममतांना धोबीपछाड? अशी आहे रणनीती!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 23, 2020 03:16 PM2020-12-23T15:16:11+5:302020-12-23T15:33:59+5:30

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगाल भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांबरोबरच योगी मॉडेलच्या माध्यमाने बंगालमधून ममतांचे राज्य उखडून टाकण्याची रणनीती तयार केली आहे.

West Bengal assembly election BJP counters to Mamata Banerjee with the help of yogi model | भाजप पश्चिम बंगालमध्ये 'योगी मॉडेल'ने देणार ममतांना धोबीपछाड? अशी आहे रणनीती!

भाजप पश्चिम बंगालमध्ये 'योगी मॉडेल'ने देणार ममतांना धोबीपछाड? अशी आहे रणनीती!

Next
ठळक मुद्देयावेळी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली आहे.भाजपने उत्तर प्रदेशातील योगी मॉडेलच्या माध्यमाने ममता बॅनर्जींना घेरण्याची रणनीती आखली आहे.भाजप बंगालमध्ये ममता बॅनर्जींवर सातत्याने मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप करत आला आहे.

कोलकाता - यावेळी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली आहे. पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप सर्व प्रकारचे डावपेच खेळत आहे. याचाच एक भाग म्हणून आता भाजपने उत्तर प्रदेशातील योगी मॉडेलच्या माध्यमाने ममता बॅनर्जींना घेरण्याची रणनीती आखली आहे.

बिहार आणि हैदराबादनंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पश्चिम बंगालमध्येही निवडणूक प्रचार करतील. तसेच, कोरोना काळात स्थलांतरित मजूरांसाठी केलेल्या कामांबरोबरच, लव्ह जिहादवर केलेला कायदा, भ्रष्टाचाराचा झिरो टॉलरन्स आणि राम मंदिर उभारणीच्या कामासंदर्भातही ते आपली कामे जनतेसमोर ठेवतील, असे मानले जात आहे. 

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगाल भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांबरोबरच योगी मॉडेलच्या माध्यमाने बंगालमधून ममतांचे राज्य उखडून टाकण्याची रणनीती तयार केली आहे. भाजप बंगालमध्ये ममता बॅनर्जींवर सातत्याने मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप करत आला आहे. यामुळे फायर ब्रँड हिंदू नेत्याची छबी बनलेले योगी आदित्यनाथ हे 'मिशन बंगाल'साठी अत्यंत उपयुक्त सिद्ध होऊ शकतात. 

योगींनी 'भाग्यनगर'मध्ये वाढवली भाजपची चमक -
बिहारमध्ये निवडणूक प्रचार करणारे योगी हे भाजपचे एकमेव मुख्यमंत्री आहेत. त्यांनी यूपीच्या 7 जागांवर झालेल्या विधानसभा पोट निवडणुकीचीही धुरा सांभाळली होती. एवढेच नाही, तर नुकत्याच हैदराबादमध्ये झालेल्या महानगर पालिका निवडणुकीसाठीही (GHMC) योगी आदित्यनाथांनी प्रचार केला होता. यावेळी त्यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्यात येईल असेही म्हटले होते. निवडणूक निकालात याचा परिणामही बघायला मिळाला होता. या निवडणुकीत भाजपने 48 जागा मिळवल्या तर ओवेसींच्या AIMIMला तिसऱ्या स्थानावर ढकलून भाजप तेथे क्रमांक दोनचा पक्ष ठरला. याशिवाय योगींनी बिहार निवडणुकीतही एकूण 19 सभा केल्या होत्या.

योगी पश्चिम बंगालमध्ये भाजपचे मनोबल वाढवतील. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे. यासाठी भजपने आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली आहे. बंगालमधील भाजपच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होताना दिसत आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 40 टक्के मते मिळाली. याच बरोबर त्यांनी 42पैकी 18 जगांवर विजयही मिळवला होता. तर ममतांच्या तृणमूल काँग्रेसला 43 टक्के मते मिळाली होती आणि त्यांनी 22 जागा जिंकल्या होत्या.

बंगालमध्ये 200हून अधिक जागा जिंकण्याचा दावा -
गेल्या काही दिवसांत टीएमसीतील नेत्यांनी बंड करून भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे ममतांना मोठा फटका बसला आहे. तर भाजपचे मनोबल वाढले असून अमित शाह यांनी भाजप बंगालमध्ये 200हून अधिक जागा जिंकेल, असा दावा केला आहे. यामुळे, आता बंगालमध्ये 'योगी मॉडेल'चा भाजपला कितपत फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.


 

Web Title: West Bengal assembly election BJP counters to Mamata Banerjee with the help of yogi model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.