"भाजप द्वेषाचे राजकारण करते, म्हणूनच पक्ष सोडला", बाबुल सुप्रियो यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 12:00 PM2022-03-19T12:00:14+5:302022-03-19T12:02:49+5:30
Babul Supriyo : भाजप द्वेषाचे राजकारण करते, म्हणून पक्ष सोडला, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालेल्या बाबुल सुप्रियो यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजप द्वेषाचे राजकारण करते, म्हणून पक्ष सोडला, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे.
बाबुल सुप्रियो यांनी पक्ष बदलल्याबद्दल सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. शुक्रवारी (18 मार्च 2022) त्यांनी ट्विट केले की, "मी द्वेष आणि फुटीरतावादी राजकारणामुळे पक्ष (भाजप) सोडण्याचा निर्णय घेतला. मी अशा प्रकारच्या राजकारणाशी अधिक संलग्न होऊ शकत नाही."
याचबरोबर, बाबुल सुप्रियो यांच्या मते, "आसनसोलच्या लोकांना माहित आहे की मी बंगालमध्ये 70:30 किंवा 80:20 सारखे सांप्रदायिक आणि संकुचित विचारसरणीचे राजकारण कधीच केले नाही आणि करणार नाही."
दरम्यान, बाबुल सुप्रियो हे पश्चिम बंगालमधील बालीगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत. बाबुल सुप्रियो यांना केंद्रात मंत्रीपदावरून हटवल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी भाजप सोडला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजप सोडला आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात अग्निमित्र यांना उमेदवारी दिली
दरम्यान, पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने आमदार अग्निमित्रा पाल यांना तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात उभे केले आहे. त्याचवेळी, कोलकाताच्या बालीगंज विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपने पक्षाच्या महिला मोर्चाच्या नेत्या केया घोष यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी तृणमूल काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना उमेदवारी जाहीर केली आहे.