"परवानगीची आवश्यकता नाही, पोलीस आडवतील, तेथेच..."; राम नवमीच्या पार्श्वभूमीवर सुवेंदू अधिकारी यांचं थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 09:45 IST2025-03-27T09:40:51+5:302025-03-27T09:45:08+5:30
"बंगाल भाजप ओबीसी मोर्चा याविरोधात आवाज उठवेल आणि रामनवमीनंतर रस्त्यावर उतरेल..."

"परवानगीची आवश्यकता नाही, पोलीस आडवतील, तेथेच..."; राम नवमीच्या पार्श्वभूमीवर सुवेंदू अधिकारी यांचं थेट आव्हान
पश्चिम बंगालमध्ये ओबीसी प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासंदर्भात विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातील ममता सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हे सर्वेक्षण असंवैधानिक असून राज्य सरकार केवळ मुस्लीम समाजावर लक्ष केंद्रित करून हे सर्वेक्षण करत आहे. हे न्याय्य नाही, असे अधिकारी यांनी म्हटले आहे.
बंगाल भाजप ओबीसी मोर्चा याविरोधात आवाज उठवेल आणि रामनवमीनंतर रस्त्यावर उतरेल -
पत्रकार परिषदेत बोलताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, "ओबीसी यादीत अनेक समुदायांना बेकायदेशीरपणे समाविष्ट करण्यात आले होते, जे उच्च न्यायालयाने फेटाळले. याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न देता, तीन महिन्यांत पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकार सर्व समुदायांचे सर्वेक्षण करण्याऐवजी केवळ मुस्लीम समुदायावर लक्ष केंद्रित करत आहे. बंगाल भाजप ओबीसी मोर्चा याविरोधात आवाज उठवेल आणि रामनवमीनंतर रस्त्यावर उतरेल. तसेच, पुढील सोमवारी अथवा मंगळवारी उच्च न्यायालयातही जाईल."
"पोलीस जेथे अडवतील, तेथे रामनवमी उत्सव साजरा केला जाईल" -
रामनवमी उत्सवासंदर्भातील प्रशासनाच्या धोरणावरूनही सुवेंदू अधिकारी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सुवेंदू म्हणाले, "मिरवणूक काढण्यासाठी कुणाच्याही परवानगी आवश्यकता नाही. पोलीस जेथे अडवतील, तेथेच रामनवमी उत्सव साजरा केला जाईल. घरांमध्ये, रस्त्यावर, नदीकाठी, डोंगरांवर सर्वत्र प्रभू रामचंद्रांची पूजा केली जाईल. आम्ही हिंदू समाजासोबत हाती झेंडे घेऊन 'जय श्री राम'चा जयघोष करत बाहेर पडू." एवढेच नाही तर, 'जो हिंदू हित में काम करेगा, वही बंगाल में राज करेगा,' असेही सुवेंदू यावेळी म्हणाले.