लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपचे कार्यालय पाडले, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 16:32 IST2024-06-27T16:31:24+5:302024-06-27T16:32:15+5:30
यामुळे भाजप आणि तृणुमूल काँग्रेसमधला संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपचे कार्यालय पाडले, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
BJP Office Demolished : लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी पश्चिम बंगालची राजधानी कोलकातासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिक्रमणाविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या अंतर्गत कोलकाता येथे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) कार्यालय पाडण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
फूटपाथवरील दुकानेही हटविण्यात आली
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील गोरागाचा, तरातळा येथील भाजपच्या कार्यालय पाडण्यात आले. याशिवाय, पश्चिम बंगाल पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत फूटपाथवर उभारलेली हजारो दुकानेही हटवली आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (27 जून 2024) फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून चालवलेल्या मोहिमेबाबत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कोलकाता आणि सॉल्ट लेकमध्ये फूडस्टॉल, कपडे आणि विविध उत्पादने विकणाऱ्या फेरीवाल्यांना मंगळवारी (25 जून) हटण्यास सांगितले होते. तसेच, कोलकाता पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून जेसीबी मशिनच्या सहाय्याने भवानीपूर भागातील सरकारी एसएसकेएम रुग्णालयासमोरील फूटपाथ, हातीबागन आणि गरियाहाट भागातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. सध्या राज्यात अनेक ठिकाणी अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र झाली आहे.