West Bengal: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मिरवणुकीवर हल्ला आणि बॉम्बफेक; तृणमूलवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 08:55 PM2022-09-11T20:55:49+5:302022-09-11T20:56:12+5:30
West Bengal: कूचबिहार जिल्ह्यातील सीतलकुचीमध्ये पोलिसांसमोर भाजपच्या मिरवणुकीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
कूचबिहार:पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील सेटलकुचीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मिरवणुकीदरम्यान हल्ला आणि बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा हल्ला तृणमूल काँग्रेसने (TMC) केल्याचा आरोप भाजपने केला आहे. 13 सप्टेंबरच्या भाजपच्या 'नबन चलो' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर रविवारी सीतालकुचीमध्ये 'चोर धरो, जेल भरो' मिरवणूक काढण्यात आली. याच मिरवणुकीवर हल्ला झाला. मात्र, तृणमूलने बॉम्बस्फोटाचे आरोप फेटाळून लावले आहेत.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप पूर्वघोषित कार्यक्रमासाठी रविवारी मिरवणूक काढत होता. 13 सप्टेंबर रोजी होणारी नबन मोहीम यशस्वी करण्यासाठी पक्षाचे नेते आणि समर्थक मिरवणुकीत घोषणाबाजी करत होते. यादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तृणमूलने मिरवणुकीवर हल्ला आणि बॉम्बस्फोट केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पोलिस घटनास्थळी हजर असतानाही भाजप कार्यकर्त्यांवर लाठ्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून तेथील पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी तणाव वाढला.
सभा बिघडवण्यासाठी तृणमूलने हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, तृणमूलने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आता एक मोठा प्रश्न उपस्थित होतो की पोलिसांच्या उपस्थितीत परिस्थिती नियंत्रणाबाहेर कशी गेली? विधानसभा निवडणुकीच्या वेळीही सेटलकुची चर्चेत होती. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी सीआरपीएफच्या जवानांनी जमावावर गोळीबार केला होता. यामध्ये चार जणांचा मृत्यूही झाला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. याविरोधात ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.