West Bengal: पश्चिम बंगालमध्ये राडा; नेताजींच्या प्रतिमेला हार घालण्यावरुन भाजप-तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 02:47 PM2022-01-23T14:47:43+5:302022-01-23T14:50:57+5:30
West Bengal: परिस्थिती इतकी बिघडली की, भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांना हवेत गोळीबार करावा लागला.
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये अनेकदा भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली पाहायला मिळाली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त रविवारी पश्चिम बंगालमधील बॅरकपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात टीएमसी आणि भाजपमध्ये संघर्ष झाला. यावेळी नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती इतकी बिघडली की भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांना हवेत गोळीबार करावा लागला.
#WATCH | Scuffle broke out between TMC and BJP supporters during an event on the 125th birth anniversary of Netaji #SubhasChandraBose, in Bhatpara, West Bengal. pic.twitter.com/kRr6dIJWtl
— ANI (@ANI) January 23, 2022
सुरक्षा रक्षकांचा हवेत गोळीबार
यावेळी भाजप खासदार अर्जुन सिंह घटनास्थळी पोहोचताच टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि नंतर हाणामारी सुरू झाली. TMC कार्यकर्त्यांनी अर्जुन सिंह यांना लक्ष्य करत दगडफेक केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यानंतर अर्जुनसिंग यांच्या सुरक्षा रक्षकांना हवेत अनेक राऊंड गोळीबार करुन अर्जुनसिंग यांना सुरक्षित स्थळी न्यावे लागले. यावेळी पोलीसही घटनास्थळी हजर होते.
पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला. अर्जुन सिंह यांच्या गाडीचीही तोडफोड केल्याचा आरोप भाजपने केला आहे. परिसरात तणावाचे वातावरण पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा कर्मचार्यांनी 7 राउंड फायर केल्याचा आरोप टीएमसीने केला आहे.