West Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 05:45 AM2021-05-18T05:45:01+5:302021-05-18T05:45:58+5:30
कार्यकर्त्यांकडून सीबीआय कार्यालयावर दगडफेक
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये काही वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या नारदा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील दोन मंत्री आणि तृणमूलच्या अन्य दोन नेत्यांना अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर संतप्त झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थेट सीबीआयच्या कार्यालयात धडकल्या तर बाहेर गोळा झालेल्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर दगडफेक केली. अटक केलेल्या चारही नेत्यांची विशेष सीबीआय कोर्टाने संध्याकाळी जामीनावर सुटका केली परंतु कोलकाता हायकोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने या नेत्यांना १९ मे पर्यंत सीबीआयच्या कोठडीत राहावे लागणार आहे. या नेत्यांच्या सुटकेसाठी तृणमूलचे कार्यकर्ते सीबीआय कार्यालय व कोर्टाबाहेर ठाण मांडून होते.
सीबीआय अधिकाऱ्यांनी सोमवारी फिरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी या मंत्र्यांसह तृणमूलचे आ. मदन मित्रा तसेच कोलकात्याचे माजी महापौर सोवन चॅटर्जी यांना अटक केली. राज्यपाल जगदीप धनकड यांनी मंत्री तसेच आमदारांच्या अटकेला मंजुरी दिली होती.
राजभवनाबाहेर निदर्शने
या प्रकारानंतर राज्यपाल धनकड यांनी ट्विट करून राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे म्हटले. या ट्विटनंतर राजभवनाबाहेरही तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. तर मंत्र्यांच्या अटकेनंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळला. ममता बॅनर्जी यांनीच हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप करून भाजपचे खा. दिलीप घोष यांनी तक्रार दाखल केली.
अधिकाऱ्यांना सुनावले
विधानसभा अध्यक्ष व राज्य सरकारच्या परवानगीशिवाय अशी कारवाई करता येत नसल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ममता बॅनर्जी यांनी सुनावले. बेकायदा कारवाई करणाऱ्यांवर कारवाईची मागणी तृणमूलच्या नेत्यांनी कोलकाता पोलिसांकडे केली.