पार्थ चॅटर्जी यांच्यामुळे ममता बॅनर्जी माध्यमांपासून दूर?; पंतप्रधान मोदींचीही घेतली दोनवेळा भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:27 AM2022-08-07T07:27:20+5:302022-08-07T07:27:28+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता मागील दोन दिवस दिल्लीत आहेत.
- शरद गुप्ता
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना नेहमीच माध्यमस्नेही मानले जात असताना, त्या माध्यमांपासून दूर का राहात आहेत? त्यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या भ्रष्टाचाराबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना त्या सामोरे जाऊ इच्छित नाहीत का? ममता मागील दोन दिवस दिल्लीत आहेत. या कालावधीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनवेळा भेट घेतली. रविवारी नीती आयोगाच्या बैठकीत त्या पुन्हा मोदींना भेटू शकणार आहेत. परंतु या कालावधीत त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह कोणत्याही विरोधी पक्षनेत्याला भेटलेल्या नाहीत. एरवी प्रत्येक दौऱ्यात त्या विरोधी नेत्यांच्या भेटी घेत असतात.
या दौऱ्यात माध्यमे त्यांच्याबरोबर सावलीसारखी होती. परंतु त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सावलीत होत्या. पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी इशाऱ्याने नकार दिला. एवढेच नव्हे, तर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तृणमूलचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांच्या घरी आधीच ठरलेली पत्रपरिषदही रद्द करण्यात आली. अखेर त्यांचे स्वीय सहायक रतन मुखर्जी यांनी स्पष्ट केले की, त्या यावेळी माध्यमांशी बोलणार नाहीत. परंतु याचे कारण त्यांनी सांगितले नाही. त्यांनी सांगितले की, ममता यावेळी आमच्याशीही बहुतांशवेळा इशाऱ्यातूनच बोलताहेत.