'दीदी ओ दीदी'ला प्रत्युत्तर? PM मोदींचं नाव न घेता ममता बॅनर्जी म्हणाल्या...नंदलाल ओ नंदलाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 07:56 PM2023-03-29T19:56:33+5:302023-03-29T20:03:06+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केंद्रातील मोदी सरकारविरोधातील दोन दिवसांच्या धरणे आंदोलनाला सुरुवात केली.
कोलकाता-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केंद्रातील मोदी सरकारविरोधातील दोन दिवसांच्या धरणे आंदोलनाला सुरुवात केली. केंद्राकडून राज्याची थकबाकी अद्याप मिळालेली नसल्यानं त्या आंदोलन करत आहेत. याच आंदोलनात ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
बंगालच्या निवडणुकीवेळी एका प्रचारसभेत मोदींनी आपल्या भाषणात ममता बॅनर्जी यांचा 'दीदी ओ दीदी' असा उल्लेख करत खिल्ली उडवली होती. आता याला प्रत्युत्तर देत ममता बॅनर्जी यांनी मोदींचा उल्लेख 'नंदलाल ओ नंदलाल' असा केला आहे. अर्थात ममता यांनी यावेळी मोदींचे थेट नाव घेतलं नाही. पण त्यांनी केलेला उल्लेख 'दीदी ओ दीदी'ला दिलेलं प्रत्युत्तर मानलं जात आहे.
ममता बॅनर्जी यांनी याआदी केंद्रावर निशाणा साधत पंतप्रधान आवासाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. "मी सात वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे. केंद्रातही मंत्री राहिले आहे. आता हे भाजपावाले मला संविधान शिकवणार का? मी पोलीस कमिश्नर राजीव कुमार यांच्याविरोधात आंदोलनाला बसले होते. मी एका राज्याची मुख्यमंत्री आहे. बंगालच्या जनतेसाठीचा निधी केंद्रानं बंद करुन टाकला आहे. कारण इथं माझा पक्ष सत्तेत आहे. गरज पडली तर पंतप्रधान आवासाबाहेरही आंदोलन करण्याची माझी तयारी आहे", असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
भाजपा गुंडांचा पक्ष
भाजपामध्ये गुंडांचा भरणा आहे. एक नेता म्हणतो रामनवमीच्या रॅलीमध्ये हत्यारं घेऊन चालणार, मी रामनवमीची रॅली रोखणार नाही. पण एखाद्या मुस्लिमाच्या घरावर जर हल्ला होत असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.