ममता बॅनर्जींचा थोडा हटके अवतार; विवाह सोहळ्यात वाद्यांच्या तालावर थिरकल्या
By देवेश फडके | Published: February 2, 2021 03:57 PM2021-02-02T15:57:39+5:302021-02-02T16:00:26+5:30
आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या या धामधूमीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक वेगळाच पण थोडा हटके अवतार पाहायला मिळाला.
कोलकाता :पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकांना अद्याप बराच कालावधी असला, तरी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस, डावे पक्ष यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमधीलराजकारण बरेच तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरूच आहे, तर भाजपमधील इन्कमिंगही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मात्र, निवडणुकीच्या या धामधूमीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक वेगळाच पण थोडा हटके अवतार पाहायला मिळाला.
नेहमी आक्रमक दिसत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चक्क एका विवाह सोहळ्यात वाद्यांच्या तालावर थिरकताना दिसल्या. एएनआय या वृत्तसंस्थेने याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ अलीपूरद्वार जिल्ह्यातील फलकटा नामक भागातील आहे. फलकटा भागात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
राजीनामा सत्र सुरूच; आमदार दीपक हलदर यांची तृणमूलला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाची शक्यता
फलकटा येथील सामूहिक विवाह सोहळ्याला खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हजेरी लावली. इतकेच नाही, तर या विवाह सोहळ्यात त्यांनी वाद्यांच्या तालावर नाचतानाही दिसल्या. या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी नेहमीच्या पेहरावात दिसत आहेत. या विवाह सोहळ्यात काही महिला बासरी आणि ढोलकीच्या तालावर पारंपरिक नृत्य करत होत्या. या नृत्यात ममता बॅनर्जी यांनीही सहभागी होऊन बासरी आणि ढोलकीच्या तालावर थरकताना दिसल्या. व्हिडिओमध्ये महिलांनी एकमेकांचा हात धरत नृत्य करत असल्याचे दिसत आहे.
#WATCH | West Bengal CM Mamata Banerjee dances during a mass marriage ceremony in Falakata of Alipurduar district. pic.twitter.com/zIDyhRDS7x
— ANI (@ANI) February 2, 2021
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींसमोर भाजपचे तगड आव्हान असणार आहे. भाजपही संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरलेला पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत कार्यकर्ते, आमदार, मंत्री, नेते भाजपमध्ये प्रवेश घेताना दिसत आहेत.