"जेवणासाठी पैसे हवे असतील तर मी देईन…", ममता बॅनर्जी राज्यपालांना असं का म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 02:55 PM2024-07-24T14:55:46+5:302024-07-24T15:02:07+5:30
Mamata Banerjee : आमदारांना दंड ठोठावल्याने ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल सी.वी.आनंद बोस यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.
कोलकाता : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल सी.वी.आनंद बोस यांच्यात विविध कारणांवरून वाद सुरू आहे. अशात आता चार नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी प्रक्रियेबाबत दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचे दिसून येते. राज्यपालांनी चार नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी प्रक्रियेत विनाकारण अडथळे निर्माण केल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निडवणुकीबरोबरच विधानसभेची पोटनिवडणूकही पार पडली होती. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या चार उमेदवारांचा विजय झाला होता. त्यानंतर ५ जुलै रोजी विधानसभेत त्यांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. मात्र, काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना राज्यपालांनी पत्र लिहत त्यांची शपथ घटनात्मदृष्ट्या योग्य नसल्याचं सांगितलं. तसंच त्यांना सभागृहाच्य कामकाजात सहभागी होण्यास मनाई केली. मात्र, तरीही दोन्ही आमदारांनी सभागृहाच्या कामकाजत भाग घेतला. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना प्रतिदिन ५०० रुपयांचा दंड ठोठावला.
आमदारांना दंड ठोठावल्याने ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल सी.वी.आनंद बोस यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. आमदारांना दंड ठोठवायला राज्यपालांकडे पेसै नाहीत का? त्यांना जेवण्याच्या डब्यासाठी पैसे हवे असतील तर त्यांनी माझ्याकडे मागावे, मी त्यांना पैसे देईन, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना लगावला. तसंच, राज्यपाल सभागृहाच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
जनादेशाच्या जोरावर निवडून आलेल्या आमदारांचं कौतुक करण्याऐवजी दंड ठोठावत आहात. ही क्रूरता आहे, दोन नवनिर्वाचित आमदारांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा प्रयत्न आहे. राज्यपालांनी हे लक्षात ठेवावं की त्यांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे केली जाते. तुम्ही संविधानाचे पालन केले पाहिजे आणि कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाप्रती पक्षपाती होऊ नका. राज्यपालांना नीट परीक्षेतील घोटाळेबाजांना दंड ठोठावता येत नाही. ते घोटाळेबाज त्यांना दिसत नाही. त्यांना दंड ठोठावण्यासाठी फक्त आमदार दिसतात, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.